अमरावती : भाजपची उमेदवारी गृहीत धरून प्रचाररथ वेगाने पुढे नेण्‍याच्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या प्रयत्‍नांना महायुतीमधून मिळालेले आव्‍हान आणि भाजपच्‍या स्‍थानिक नेत्‍यांच्‍या उघड विरोधामुळे खीळ बसली आहे. बच्‍चू कडूंनीही विरोधाची धार तीव्र केल्‍याने राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्‍या महिनाभरापासून नवनीत राणा यांच्‍या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. पण, उमेदवारी अर्ज सादर करण्‍याची तारीख जवळ आली असतानाही प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही. आठवडाभरापूर्वी आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांचा मेळावा घेतला. भाजपकडून नवनीत राणा यांना कुठल्‍याही प्रकारचा प्रस्‍ताव आल्‍यास त्‍याला पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, असा ठराव युवा स्‍वाभिमान पक्षाने पारीत केला. पण, महायुतीच्‍या सर्व नेत्‍यांना एका मंचावर आणून नवनीत राणा यांचा प्रचार करण्‍यास भाग पाडू, घटक पक्षातील नेत्‍यांनी विरोधात काम केल्‍यास कारवाई करण्‍यास सांगू, असा इशारा रवी राणांनी स्‍थानिक नेत्‍यांना दिला, त्‍यामुळे ठिणगी पडली.

हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

महायुतीतील घटक असलेले प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला थेट विरोध करीत स्‍वतंत्र लढण्‍याची घोषणा केली. मंगळवारी रात्री उशिरा बच्‍चू कडू यांनी मुंबईत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नवनीत राणा या जर उमेदवार असतील, तर प्रहारचा महायुतीतून भाग पडण्‍याशिवाय पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच बच्‍चू कडू यांनी दिल्‍याने राणांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.

दुसरीकडे, नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी भाजपच्‍या वीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे केली आहे. मंगळवारी भाजपच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी दोन्‍ही नेत्‍यांची नागपुरात भेट घेतली. राणा दाम्‍पत्‍याच्‍या कार्यप्रणालीबाबत भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. त्‍यांचा स्‍वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारा नाही. स्‍थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्‍वासत घेतले जात नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उमेदवारीबाबत विचार व्‍हावा, अशी भूमिका भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्‍यामुळे भाजपमधील धुसफूस उघड झाली आहे.

हेही वाचा – यवतमाळच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी आधीच अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगून कुठल्‍याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा दिला आहे. त्‍यामुळे उमेदवारी मिळवताना नवनीत राणा यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्‍यातच कथित बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाची टांगती तलवार त्‍यांच्‍यावर आहे. त्‍यामुळे भाजपदेखील सावध भूमिका घेताना दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati lok sabha navneet rana controversy all around rana couple challenge from mahayuti opposition from bjp too print politics news ssb
First published on: 27-03-2024 at 16:18 IST