नागपूर : हाताशी आलेला तरुण मुलगा मनी अचानक दगावणे आणि तळहातावर जपलेल्या मुलाच्याच मृतदेहाला खांदा द्यावा लागणे, हे कोणत्याही माता- पित्यांसाठी आभाळ कोसण्यापेक्षा कमी नसते. असेच काहीसे संकट कळमना पोलीस हद्दीत डिप्टी सिग्नल येथील रहिवासी असलेल्या संतराम आणि दुर्गा फटिंग यांच्यावर बुधवारी ओढवले.

कुटुंबाला हातभार लावणारा तरुण मुलगा महेंद्र फटिंग (२५) याचा मंगळवारी रात्री डिप्टी सिग्नल जवळच्या भुयारी मार्गाला लागून असलेल्या खड्यात पडल्याने मृत्यू झाला. यावरून जमावाने देखील यंत्रणेवर संताप व्यक्त करत जनआक्रोश केला.

खड्यातली सळई महेंद्रच्या उजव्या बाजूने पोटात घुसल्याने आत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून बांधकामासाठी खोदून ठेवलेला खड्डा बुजवलाच न गेल्याने मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी खड्यात साचले. त्यामुळे काम आटोपून घरी निघालेल्या महेंद्रला हा खड्डा दिसलाच नाही. त्यामुळे त्याची गाडीसह खड्ड्यात पडला. अर्धवट बांधलेल्या सिमेंट रस्त्यातली सळई त्याच्या पोटात घुसली. त्यामुळे आत रक्तस्त्राव होऊन महेंद्रचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांनी घेतली आहे.

फटिंग कुटुंबातला महेंद्र हा मोठा मुलगा होता. त्याचे वडील संतराम हे कळमना परिसरातल्या कारखाना भागात बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात काम करतात. महेंद्रने लहान वयातच वडिलांचे श्रम पाहिल्याने तोही गेल्या २ वर्षांपासून कुटुंबाला हातभार लावत होता. कळमना भागातीलच बांधकाम साहित्य व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून तो काम करत होता. लहान भाऊ सुरज (२२) आणि किशन (२०) या दोघांच्या शिक्षणाची तो जबाबदारी घेत होता. मुलगा हाताशी आल्याने महेंद्रचे वडील संतराम यांनी त्याच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती. मात्र मंगळवारी मुसळधार पावसाच्या रुपात कुटुंबाला नजर लागली आणि फटिंग कुटुबावर आभाळच कोसळले.

रोजच्या प्रमाणे महेंद्र फटिंग कामावरुन घरी परत येत असताना डिप्टी सिग्नल जवळच्या भुयारी रसत्यावरील खड्यात त्याची दुचाकी कोसळली. खड्यातल्या सिमेंट रस्त्यात उघडी सळई त्याच्या पोटात घुसली. तो घाव वर्मी लागल्याने महेंद्र गंभीररित्या जखमी झाला. प्रत्यक्षदर्शिंनी त्याला मेयोत दाखल केले. मात्र तोवर वाटेतच त्याचा मृत्यू झाला. लकडगंज पोलिस ठाण्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोत पाठवला.

डिप्टी सिग्नल भागात जन आक्रोश

कळमना पोलीस हद्दीतील महेंद्रचे घर डिप्टी सिग्नल येथे आहे. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर लकडगंज पोलीस हद्दीत आहे. महापालिकेच्या बेजबाबदार ठेकेदारामुळे ही दुर्घटना होऊन फटिंग कुटुंबातला कर्ता तरुण मुलगा महेंद्रचा अकाली मृत्यू झाला. रेल्वेने देखील या कामाची काळजी घेतली नाही. मनपाच्या ठेकेदारामुळे गेल्या पाच वर्षांपासून भुयारी मार्गावरचा हा खड्डा बुजवला गेलेला नाही.

यापूर्वी देखील गेल्यावर्षी शाळकरी मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे महेंद्रच्या मृत्यूला मनपाचा ठेकेदार जबाबदार असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी आणि महेंद्रच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, असा आक्रोश करीत परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. संतप्त जमावाने मंगळवारी रात्री देखील कळमना पोलिस ठाण्याला गोंधळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती बुधवारी झाली. शवविच्छेदानानंतर महेंद्रचा मृतदेह घेऊन घटनास्थळी पोचलेल्या जमावाला हुसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.