नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात आज, शनिवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरातील निर्माणाधीन भव्य प्रवेशद्वाराच्या स्लॅबचा लोखंडी सांगाडा कोसळला. यामुळे १० ते १५ मजुर जखमी झाले. सायंकाळच्या वेळी मजुर काम करत असतानाच स्लॅबचा सांगाडा त्यांच्या अंगावर येऊन कोसळला. मजूर त्या खाली दबल्याने परिसरात गोंधळ उडाला.

मंदिराच्या मागील बाजूस ३० ते ३५ फुटांचे भव्य प्रवेशद्वार उभारले जात आहे. त्याचे काम सुरू आहे. अंदाजे ८०० चौरस मिटरच्या या स्लॅबचे कंत्राट बी. व्ही. जी. कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. शनिवारी या बांधकामाचा लोखंडी सांगाडा तयार करण्यात आला. त्यात सिमेंट आणि काँक्रिट भरले जाणार होते. मात्र संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास हा सांगाडाच खाली कोसळला. त्यावेळी १५ मजूर कामावर उपस्थित होते. स्लॅबचा हा लोखंडी सांगाडा अंगावर पडल्याने मजूर त्याकाळी दबले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

कोराडीचा परिसर ग्राम पंचायतमध्ये मोडतो. त्यामुळे येथे अग्निशमक विभाग पूर्णतः कार्यान्वित नाही. मात्र शेजारीच अगदी ३०० मिटर अंतरावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे (एनडीआरएफ) स्टेशन आहे. मानकापूर अग्निशमक विभागाला घटनास्थळी पोचण्यास वेळ लागू शकत होता. यामुळे अगदी हाकेच्या अंतरावरील एनडीआरएफच्या पथकाला तातड़ीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जखमींना बाहेर काढत नंदिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोराडी मंदिरातील सूत्रांनी याला दुजोरा दिला.

जिल्हाधिकारी घटनास्थळी

झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तातडीने घटनास्थळ कोराडी मंदिराकडे रवाना झाले. ते स्वतः पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात आहेत.

चार रुग्ण मॅक्स रुग्णालयात

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार रुग्णांना तातडीने कोराडी मार्गावरील मॅक्स या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांपैकी काही रुग्णांची हाडे मोडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या सर्व जखमींवर मॅक्स रुग्णालयातील आकस्मिक अपघात विभागात उपचार सुरू आहेत.

मेडिकल, मेयो ‘अलर्ट मोड’वर

जखमींना तूर्त कोराडी मार्गावरील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी घटनेचे गांभीर्य आणि गरज लक्षात घेता मेडिकल, मेयो रुग्णालयातील डॉक्टरांना ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. मेयोतील अपघात विभाग आणि मेडिकलमधील ‘ट्रामा’ सेंटरच्या चमूला सतर्क करण्यात आले आहे. मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी तशा सूचना केल्या आहेत.