scorecardresearch

नागपूर : ‘एमबीबीएस’ला प्रवेश पाहिजे, ५० लाख द्यावे लागतील…

मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली.

man cheated for 50 lakhs in the name of mbbs admission
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

बारावीत कमी गुण मि‌ळाले. मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्यामुळे वडिलांना लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली. मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली. हा प्रकार मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित नगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी ओमप्रकाश वंदेवार (४१), यांचे सलून आहे. त्यांना दोन मुली आहेत. डॉक्टर व्हायचे असल्याने मुलीने ‘नीट’ची परीक्षा दिली. मात्र, गुण कमी पडल्याने तिला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाला नाही.

हेही वाचा >>> पूर्व विदर्भात विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ

दरम्यान, वंदेवार नेहमीच धार्मिक स्थळावर जात असत. तेथील ओळखीच्या लोकांना त्यांनी ही समस्या सांगितली. काही लोकांनी ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देणारे एम. विजय कुमार (४६), अन्नू सॅम्युअल (४१) आणि जेकब थॉमस (५४), सर्व रा. वेल्लूर, तामिळनाडू यांची नावे दिली. वंदेवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आधी फोनवर नंतर प्रत्यक्षात वेल्लूरला जावून चर्चा केली. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर येथे मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन मिळाले.

यासाठी ८० लाख रुपये लागतात, परंतु तुम्ही परिचयातून आल्याने ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले गेले. पन्नास लाखांत सौदा पक्का झाल्यानंतर वंदेवार यांनी रोख एक लाख रुपये दिले. यानंतरची रक्कम ‘ऑनलाईन ट्रान्सफर’ करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ५२ लाख रुपये दिले गेले. रक्कम पूर्ण देण्यात आली आणि वेळ निघून गेल्यानंतरही प्रवेशाचा काही पत्ता नव्हता. तर दुसरीकडे तामिळनाडूतील आरोपींनी पुन्हा १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे वंदेवार नाराज झाले. ५० लाख रुपयात सौदा झाल्यानंतर आता अधिक रक्कम कशाला? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी  रक्कम देण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> ‘एसटी’च्या बसगाड्यांची डिक्की ‘लॉक’.. पार्सल वाहतूक कशी होणार

तसेच आता प्रवेश नको आमची रक्कम परत करा, अशी मागणी केली. मात्र, आरोपी पैसे देण्याच्या तयारीत नव्हते. वंदेवार पैशासाठी तगादा लावत होते. मात्र, आरोपी दिवसामागून दिवस ढकलत होते. त्यांनी मानकापूर पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 11:21 IST
ताज्या बातम्या