लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जाणे व्यक्तीला भलतेच महागात पडले. हे महाशय मग अंधाऱ्या रात्री गारठवणाऱ्या थंडीत रात्रभर खोल विहिरीत अडकले. सकाळचे दहा देखील तिथेच वाजल्यावर मग पोलिसांनी बचाव अभियान राबवून त्यांना बाहेर काढले.

बुलढाणा शहरातील केशवनगरमधील रहिवासी अनंत जयसिंग गायकवाड (५३) हे सोमवारी दुचाकीने मोताळा येथील सेवगीर बाबांच्या आश्रमाकडे निघाले. राजूर घाट पार करून ते मोताळा येथे आले. लघुशंकेसाठी ते रस्त्यालगतच्या अंधार असलेल्या भागात गेले असता पायाला ठेच लागून थेट एका विहिरीत पडले. काही मिनिटांनंतर भानावर आल्यावर त्यांनी स्वत:ला कसेबसे सावरले. विहिरीला असलेल्या दोराला घट्ट पकडून स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न केला. अधूनमधून जिवाच्या आकांताने मदतीसाठी ‘कोई है’ असे रात्रभर ओरडत राहिले. दुर्दैवाने त्या भागात रात्रीच काय आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत कुणीच फिरकले नाही.

हेही वाचा – ‘या’ गावात आहे धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा; साकडं पूर्ण करण्यासाठी भक्त करतात ‘अग्निदिव्य’

हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोताळा नांदुरा मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्राकडे वर्दळ सुरू झाल्यावर त्यांचा आवाज ऐकणाऱ्या नागरिकांनी बोराखेडीचे ठाणेदार बळीराम गीते यांना ही माहिती दिली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व कर्मचारी यशवंत तायडे, शरद खर्चे, अभिनंदन शिंदे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी शिवाजी देशमुख, योगेश देशमुख यांच्या मदतीने अनंत गायकवाड यांना बाहेर काढले. त्यांना त्यांचे मामा चंद्रकांत साळुंके यांच्या स्वाधीन करण्यात आले.