नागपूर : राज्यात डांस बारला बंदी आहे. तरीही मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या शहरात सुगम संगितचा परवाना मिळवत महिलांकडून अश्लिल नृत्य करवून घेत असल्याचे बुधवारी आढळले. याची कुणकुण लागल्याने गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बेकायदेशीर सुरू असलेला डान्सबार उधळून लावला.
कळमना पोलीस हद्दीतल्या जुना कामठी मार्गावरील उड्डाणपुलाखालील मद्यालयात शिवशक्ती नावाने हा अवैध डान्सबार सुरू होता. सुगम संगीतच्या नावाखाली बार संचालाने परवाना मिळवत हा डान्सबार सुरू केला होता. तिथून पथकाने अश्लिल नृत्य करत असताना ३ बारबाला तरुणींची बुधवारी रात्री सुटका केली.
अवैध डान्सबार चालविणारा संचालक गोपाल उर्फ चंपालाल यादव (५४ त्याचा मुलगा दिप गोपाल यादव (३०), बारचा व्यवस्थापक गुलाब ताराचंद रहांगडाले (३८) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोबतच पथकाने ग्राहक म्हणून आलेल्या अन्य २२ जणांविरुद्ध तोकड्या कपड्यातल्या महिलांवर पैसे उधळल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी बारचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात मद्यपान कक्षातील महिलांकडून अश्लिल कृत्य करून घेत प्रतिष्ठेचे हनन केल्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले.
पथकाने डान्सबारमध्ये महिलांसोबत अश्लिल नृत्य केल्याचा ठपका ठेवत ग्राहक म्हणून आलेले संजय बारापात्रे, प्रदिप गोंडाने, प्रदिप गजभिये, रमेश मल्लेवार, सचिन भुसारी, जितेंद्र रहांगडाले, सुबोध पगाडे, अतूल कटरे, मयूर डहाळे, सौरभ दहिवाळ, पवन देशपांडे, अनिल कांबळे, सुरज दवाळे, अभय घाटोळे, शेरू चिंचधरे, विजेंद्र शाहू, राहूल सपकाळ, हितेश ठाकूर, प्रफुल्ल चव्हाण, विकास काळे, रामनाथ दिल्लीकर, मुकेश यादव यांच्याविरोधातही कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणात कारवाई केली. पथकाने आरोपींच्या ताब्यातून रोख ४६ हजार रुपये, ३ दुचाकी, २ चार चाकी, २४ भ्रमणदूरध्वनी संच आणि वाद्यसामुग्री असा मुद्देमाल जप्त केला. पथकाने हा डान्सबार तुर्तास सील केला असून त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.