बुलढाणा: पूर आणि पुरात अडकणे म्हणजे जीवावरचे संकट. यामुळे पुरात अडकलेल्या व्यक्ती कधी आपली सुटका होते अन कधी जीव वाचतो याची प्राण डोळ्यात आणून वाट पाहतात. मात्र, मेहकर तालुक्यात एक आगळी वेगळी घटना घडली. पुरात अडकले असताना जिल्हा आपत्ती बचाव पथक सुटकेसाठी आले मात्र चौघा व्यक्तींनी पथकासोबत जाण्यास विनम्रपणे नकार दिला. यामुळे बुचकळ्यात पडलेले बचाव पथक आणि अधिकाऱ्यांना त्यांनी याचे कारण सांगितल्यावर अधिकारी, कर्मचारी थक्क झाले. सोबतची पाळीव जनावरे सोडून आम्ही जाणार नाही, असे सांगून आमची तीन दिवस खाण्या पिण्याची व्यवस्था करा, आम्ही इथेच राहणार अशी विनवणी केली. त्यांची ही विनंती मान्य करून प्रशासनाने त्यांची तीन दिवसांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली.
या चौघाची कर्तव्य निष्ठा, प्रामाणिकपणा आणि भूतदया यामुळे बचाव मदतीसाठी आलेले अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला महापुर आला आहे. शहरातील रामनगर येथील पणन महासंघाचे सेवानिवृत्त अधिकारी सिताराम केळे यांचे शेत ओलांडेश्वर मंदिराजवळ, पैनगंगा नदीकाठी आहे.
या शेतात माळीपेठ येथील गोरे कुटुंब सालदार म्हणून कामाला असून तीथेच वास्तव्यास आहे. रविवारी नामदेव बाबुराव गोरे, अरुण नामदेव गोरे, पार्वती अरुण गोरे आणि रूपाली अरुण गोरे शेतात गेले. मात्र नदीला अचानक पूर आल्याने तेथेच अडकून पडले.आज सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ही बाब उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी व तहसीलदार निलेश मडके यांना कळविण्यात आली. तहसीलदार निलेश मडके यांनी कर्मचाऱ्यांसाह तातडीने घटनास्थळ गाठले. चौघांना परत आणण्यासाठी बुलढाणा येथून एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली होती.
मात्र चौघांनी मोबाईलवरून संपर्क साधत, “आमची जनावरे येथे असल्याने आम्ही परत येणार नाही. आम्ही सुरक्षित आहोत. आम्हाला इथेच ३ दिवस पुरेल एवढी खाण्या-पिण्याची व्यवस्था करा,” अशी विनंती केली. त्यावर तहसीलदार निलेश मडके यांनी शेतातच त्यांच्या खाण्या-पिण्याचे साहित्य पोहोचवण्याची व्यवस्था केली. मात्र, दक्षता म्हणून एनडीआरएफ चमुला मेहकर विश्राम गृह येथे मुक्कामी ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व मेहकरचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला. मदतकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. माजी आमदार रायमुलकर यांनी ‘त्या ‘ चौघांशी संपर्क साधून धीर दिला.
या कार्यवाहीत नगरपरिषदचे मुख्याधिकारी रामराजे कापरे,बांधकाम अभियंता किशोर ढेपले, आरोग्य विभागाचे बुद्धू गवळी, नसीर शेख, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आपल्या चमसह सह उपस्थित होते. महसूल विभागाचे कर्मचारी व तलाठी वर्गानेही तत्परतेने मदतकार्य केले.
ओलांडेश्वर पाण्याखाली दरम्यान महापुरामुळे जागृत दैवस्थान म्हणून परिचित ओलांडेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे. श्रावण सोमवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी जमतात. वर्षभर देखील भाविकांची गर्दी राहते. हे मंदिर पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार निलेश मडके यांनी केले आहे.