भंडारा : निजामुद्दीन ते बिलासपूर गोंडवाना एक्सप्रेसमधून कुटुंबीयांसोबत प्रवास करीत असलेला प्रवासी पाणी घेण्यासाठी रेल्वेखाली उतरला. दरम्यान, गाडी सुरू झाली. हे पाहून चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाय घसरला. गाडी खाली आल्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही दुर्दैवी घटना तुमसर मार्ग रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

गोविंद कुमार (४८, रा. गुडगाव, हरियाणा) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. गोविंद कुमार व त्यांचे कुटुंब निजामुद्दीन ते बिलासपूर गोंडवाना एक्सप्रेसने दुर्ग येथे जात होते. तुमसर मार्ग रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यावर गोविंद कुमार पिण्याच्या पाण्याकरिता रेल्वेगाडीखाली उतरले. यादरम्यान गाडी सुरू झाली. धावत्या गाडीत चढताना गोविंद कुमार यांचा पाय घसरला. त्यामुळे ते थेट रेल्वे ट्रॅकखाली आले. क्षणात त्यांच्या अंगावरून गाडी गेल्याने शरीराचे अक्षरशा: दोन तुकडे झाले. त्यात ते जागीच गतप्राण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर प्रवासी गाडी थांबली. गोविंद कुमार यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली. त्यावेळी इतर रेल्वे प्रवाशांच्या डोळ्यातही अश्रू आले. तुमसर रोड रेल्वे जीआरपीने गुन्हा दाखल केला असून रेल्वेचे पोलीस निरीक्षक मोगेसुद्दीन पुढील तपास करीत आहेत.