नागपूर : केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा यासह इतर मागणीसाठी २ ऑगस्टपासून नागपुरातून विविध जिल्ह्यांत मंडल जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे, असे, असे मंडल जनगणना यात्रा तथा ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी यात्रेसाठीचा मार्गही जाहीर करण्यात आला.
प्रेस क्लबमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोर्राम पुढे म्हणाले, मंडल आयोगाच्या शिफारिशीमुळे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत आहे. या दिवसाच्या औचितत्याने जातीनिहाय जनगणनेचा विषय घेऊन मंडल जनगणना यात्रा २ ऑगस्टला सकाळी १० वाजता संविधान चौक नागपूर येथून सुरू होईल. ही यात्रा पुढे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्हयातून ७ ऑगस्ट २०२५ ला सायंकाळी ५ वाजता भंडारा शहरातील संताजी मंगल कार्यालय येथे येऊन येथे यात्रेचा समारोप होईल.
ओबीसी समुदायासाठी स्वतंत्र कॉलम देऊन जातीनिहाय जनगणना करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, एक लाख पदांचा बॅकलॉग तात्काळ भरावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या व यात्रेदरम्यान जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे, ओबीसी सेवा संघाचे रोशन उरकुडे आणि इतरही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा आहे यात्रेचा मार्ग…
यात्रा नागपूर शहरातील संविधान चौक, गांधी पुतळा व्हरायटी चौक बर्डी, महात्मा फुले पुतळा कॉटन मार्केट चौक, रा.भा. कुंभारे चौक गांधीबाग, भारत माता चौक, बडकस चौक, संत जगनाडे महाराज चौक, तिरंगा चौक सक्करदरा, रेशीम बाग जनरल आवारी चौक, क्रीडा चौक, तुकडोजी महाराज चौक मेडिकल चौक,अण्णाभाऊ साठे चौक, दीक्षाभूमी येथून जाईल. येथे मंडल यात्रेचे स्वागत होणार आहे. तर यात्रेसोबत १० ते २० गाड्या (चार चाकी), २५ दुचाकी, डीजे साऊंड चार चाकी गाडी सोबत, जनरेटर, मेगा साउंड सिस्टिम, बॅनर्स, प्रचार साहित्य आणि १०० कार्यकर्ते सोबत असतील, यात्रेदरम्यान विविध ठिकाणी कॉर्नर बैठका, सभा, पथनाट्य इत्यादी द्वारा जनजागृती केली जाईल, असे आयोजकांनी सांगितले.
या माहे मागण्या…
ओबीसी समुदायासाठी स्वतंत्र कॉलम देऊन जातीनिहाय जनगणना करावी.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेस (महाज्योती) १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा
राज्यातील सर्व जिल्ह्यात स्वतंत्र ओबीसी कार्यालय, ओबीसी अधिकारी, आणि महात्मा फुले ओबीसी भवन निर्माण करावे.
महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी सोबत निधी द्यावा.
घरकुल योजनेचे आर्थिक सहाय्य ५ लाख रुपये करावे.
ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी.
ओबीसींचा एक लाख पदांचा बॅकलॉग तात्काळ भरावा आणि इतर मागण्या.