नागपूर : कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकले म्हणून प्रश्न विचारले तर मारहाण करत आहेत? राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का ? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
कृषिमंत्री शेतकऱ्यांचा अपमान करतात, अधिवेशनात पत्ते खेळतात. याचा जाब विचारल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारहाण करतात, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याची मुभा मिळाली आहे का? महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरण समितीचा सदस्य आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाला इतका राग का यावा? मंत्री बेजबाबदार वागत असतील तर प्रश्न विचारायचे नाही का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी एक्स वर केला आहे.
वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नव्या वादात अडकले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सुरू असताना भ्रमणध्वनीवर ‘रमी’ खेळत असल्याची त्यांची चित्रफीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असताना कृषिमंत्र्यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.
रोहित पवार यांनी रविवारी ‘एक्स’ समाजमाध्यमावर कथितरीत्या कोकाटे रमी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याची चित्रफीत प्रसृत केली. त्याबरोबर रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त ऐकू येत नाही.
तर विधिमंडळाचे नियम आपणास माहिती आहेत. आपण भ्रमणध्वनीवर ‘रमी’ खेळत नव्हतो. डाऊनलोड झालेला खेळ बंद करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केला. रोहित पवार यांनी अर्धवट चित्रफीत प्रसारित केली. पुढील भाग दाखवलाच नाही, असेही ते म्हणाले. हे रोहित पवारांचे रिकामे उद्योग आहेत. विधान परिषदेतील कामकाज ‘यूट्यूब’वर पाहण्यासाठी आपण भ्रमणध्वनी सुरू केला होता. ‘यूट्यूब’ सुरू केल्यावर जाहिराती येतात, असे कोकाटे यांचे म्हणणे आहे. विरोधकांना आपले सरकार कधीही येऊ शकणार नाही, याची जाणीव असल्यामुळे गरळ ओकणे आणि बदनामी करण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर येथे राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कोकाटे यांचा राजीनामा घेण्याबाबत निवेदन दिले. मात्र त्यानंतर त्यांनी खेळाचे पत्ते उधळले. कृषिमंत्र्यांना हे पत्ते द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा, असे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे म्हणाले. त्यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. लाथा-बुक्क्यांनी मारामारी करत खुर्चाही फेकण्यात आल्या.