गडचिरोली : गेल्या तीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीही अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू असते. या विरोधात अतिदुर्गम मन्नेराजाराम गावाने दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल टाकत ग्रामसभेत महत्त्वाचा ठराव केला आहे. यात गावाकऱ्यांना अवैध दारू विक्रेत्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.
मुक्तीपथ गाव संघटना, ग्रामपंचायत, पेसा ग्रामसभा, पोलीस विभाग, गोटुल समिती, मुक्तीपथ-शक्तीपथ महिला संघटना, युवक संघटना तसेच शेजारच्या येचली आणि बामनपल्ली गावातील पदाधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारातून हा ठराव घेण्यात आला. यामध्ये दारू विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून विक्री करणाऱ्यांवर २० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे ठरविण्यात आले आहे.
दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांनी जनजागृती रॅलीचे आयोजन केले. विशेष म्हणजे, दारू विक्रेत्यांना शिक्षा देण्याऐवजी गांधीगीरीचा मार्ग स्वीकारण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन त्यांना समज देण्यात आली. मात्र त्याचवेळी स्पष्ट इशारा देण्यात आला की यापुढे दारू विक्री सुरू राहिल्यास कठोर कारवाई केली जाणार.
ठरावातील महत्त्वाचे मुद्दे
ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार गावकऱ्यांनी काही कठोर सामाजिक नियम आखले आहेत.
दारू विक्रेत्यांच्या शेतात गावकरी काम करणार नाहीत.
दारू विक्रेत्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेणार नाही.
त्यांच्या घरी अंत्यसंस्कारालाही कोणी जाणार नाही.
दोन दिवसांनंतर गाव संघटना व ग्रामस्थ मिळून दारू विक्रेत्यांच्या घराची पाहणी करतील.
दारू साठा आढळल्यास कारवाई करून ग्रामसभेत दंड आकारला जाईल.
महिला व युवकांचा पुढाकार
दारूबंदी मोहिमेत महिलांची लक्षणीय होती. दारूच्या व्यसनामुळे घरांवर आर्थिक व सामाजिक संकट कोसळते, यावर महिलांनी ठोस भूमिका मांडली. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील भांडणे, महिलांवरील अन्याय, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम थांबवायचे असतील तर दारूबंदी अपरिहार्य असल्याचे त्यांचे मत होते.
युवक संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. युवकांनी आपल्या भविष्यासाठी दारूविरहित वातावरणाची गरज अधोरेखित केली. दारूमुळे होणारी हिंसा, अपघात आणि समाजातील बिघाड रोखण्यासाठी युवकांचाही पुढाकार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रशासनाचा पाठिंबा
या निर्णयाला पोलीस विभागाने पाठिंबा दिला आहे. ग्रामसभेच्या निर्णयाला न्याय्य मानून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास प्रशासनही तत्पर राहील, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून या मोहिमेला बळकटी मिळाली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहणार नाही. नियमितपणे पाहणी करून दारू विक्री रोखली जाईल. गावातील प्रत्येक कुटुंबाने दारूबंदीला पाठिंबा देण्याचा संकल्प केला आहे. महिलांच्या पुढाकारासोबत युवक व ग्रामसभा एकत्र काम केल्यास दारूविरहित समाजाचा आदर्श घडवता येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सभेला इंदरशाह मडावी, नीला किन्नाके प्रेरिका मुक्तीपथ,अनिल मडावी, कृष्णा सिडाम पोलीस पाटील, राजेश मडावी, अजय सिडाम, महिला बचत गट, विद्यार्थी,गोंडवाना गोटूल समिती, व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.