नागपूर : महामार्ग मोकळा करा आणि वाहतूक सुरळीत करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देताच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी रात्री १० च्या सुमारास रस्ता मोकळा करणे सुरू केल्याने तात्पुरती वाहतूक कोंडी फुटली. मात्र, २४ तासांपासून वाहने अडकून पडलेल्या महामार्गावर नवाच पेच समोर आला.

अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्या आणि त्यात पावसामुळे सैरभैर होऊन भरकटलेल्या चालकांमुळे वाहने हटणार कशी आणि रस्ता मोकळा होणार कसा, असा पेच उद्भवला आहे. ही वाहने बाजूला घेण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

महामार्गावर अस्ताव्यस्त उभ्या वाहनांची संख्या पाहता यात आणखी काही तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील काही तास संथगतीने का होईना वाहतूक सुरू होणार असल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह वाहतूक शाखा उपायुक्त लोहित मतानी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाचा मान राखत माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याच्या सुचना केल्यानंतर रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आंदोलक आंदोलनासाठी नियोजित मैदानात दाखल होणे सुरू झाले आहे.

गाड्या अडवू नका, ट्रॅक्टर बाजूला घ्या

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांच्यासोबत शेतकरी नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर आंदोलकांना सुचना देत बच्चू कडू यांनी गाड्या अडवू नका आणि आपापले ट्रॅक्टर बाजूला घ्या, असे सांगितले. न्यायालयाला पुढे करून आंदोलन दडपले तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. सरकारने कर्जमुक्तीची तारीख दिली नाही तर रेल्वे थांबवायलादेखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही कडू यांनी सरकारला बजावले.

…तर ‘रेल्वे रोको’

राज्य सरकारतर्फे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आशीष जैस्वाल यांनी शेतकरी नेत्यांसोबत आंदोलनस्थळी जाऊन चर्चा केली. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. सातबारा कोरा करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आणि तोडगा निघाला तर आंदोलन सौम्य होऊ शकते. मात्र, चर्चा फिस्कटली आणि तोडगा निघालाच नाही, तर शुक्रवारी ‘रेल्वे रोको’ आंदोलन करू, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत होणाऱ्या चर्चेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घडमोडींत आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी शेतकरी आंदोलनात एन्ट्री होणार आहे. ते अंतरवाली सराटी येथून नागपूरच्या दिशेने निघाल्याचे सांगितले जात आहे.