महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : करोना काळातील संचारबंदीत सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा एसटी महामंडळ व परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. परंतु या भत्त्याबाबत राज्यभरात गोंधळ सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना भत्ता दिल्याचे सांगतात, तर बरेच कर्मचारी तो मिळाला नसल्याचा दावा करतात.

एसटी महामंडळाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी महामंडळात अत्यावश्यक सेवेअंतर्गत संचारबंदी कालावधीत प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता २३ मार्च २०२० पासून संचारबंदी संपेपर्यंत देण्याचे आदेश

काढले. परंतु कर्मचाऱ्यांनी सेवा दिल्यावरही प्रत्यक्षात भत्ता मिळाला नाही. दरम्यान, प्रत्यक्षात वेगवेगळय़ा विभाग नियंत्रक कार्यालयात वेगवेगळे नियम लावले जात आहे. त्यामुळे कुणाला हा भत्ता मिळाला, तर काहींना मिळाला नाही. तर काही भागात नियमाप्रमाणे सरसकट कर्मचाऱ्यांना तो मिळाला. नागपूर विभाग नियंत्रक नागुलवार यांनी सगळय़ांना भत्त्याची रक्कम दिल्याचा दावा केला. एखादे आगार सुटले असल्यास त्यांनाही भत्ता मिळणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, नागपूर विभाग नियंत्रक कार्यालय, काटोल आगारातील एकाही कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळाला नाही. सावनेरमध्ये चालक-वाहकांना भत्ता मिळाला, परंतु तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. नागपूरच्या घाटरोडमध्ये सगळय़ांना भत्ता मिळाला तर गडचिरोलीतील अहेरीत कुणालाच भत्ता नाही. अमरावती विभाग नियंत्रक कार्यालयात तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही भत्ता मिळाला नाही. वाहक-चालकांना मात्र मिळाला. परंतु अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सगळय़ांना हा भत्ता दिल्याचा दावा केला. राज्यातील इतरही बहुतांश विभाग नियंत्रक कार्यालयांमध्ये याच पद्धतीचा गोंधळ असून कर्मचाऱ्यांत रोष वाढत आहे. या विषयावर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

कामात एकसूत्रता नाही

करोनाच्या कठीण काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने सेवा दिली. त्यात अनेकांना करोना झाला, काहींचा मृत्यूही झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. परंतु राज्यभरातील कार्यालयांत एकसूत्रता नसल्याने कुठे भत्ता मिळाला, तर कुठे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.