नागपूर : मुंबईच्या रस्त्यावर मराठा समाजाचे आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्यात, पण सरकार त्यावर सध्या कारवाई करण्याच्या मानसिकतेत नाही, असे वक्तव्य गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी केले. त्यांनी ओबीसीच्या आंदोलनस्थळी सोमवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये. सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी भोयर यांनी सोमवारी भेट दिली.
पंकज भोयर म्हणाले, मराठा समाजातील आंदोलक देखील आपलेच बांधव आहेत. सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु सरकार त्यांच्यावर सध्या कारवाई करणार नाही. आंदोलकांशी चर्चा सुरू आहे, पण सध्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नाही.
मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून ओबीसींच्या साखळी उपोषणस्थळी भेट दिली. सरकार म्हणून ओबीसी आंदोलकांना आश्वस्त करतो, की सरकार ओबीसी प्रवर्गातून मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही, असेही भोयर म्हणाले.
ओबीसीसमाजच्या इतरही मागण्यात आहेत. यामध्ये महाज्योतीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, बार्टीच्या निर्णयानुसार समाजातील संस्थांना कामात प्राधान्य देण्यात येते त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थांना प्राधान्य देण्यात यावे, म्हाडा व सिडकोकडून बांधून देण्यात येणाऱ्या घरकूल योजनेत ओबीसींसाठी आरक्षण लागू करण्यात यावे, जामीनदार घेताना केवळ सरकारी नोकरी असण्याची अट शिथिल करण्यात यावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरित सुरु करण्यात. या मागण्याही सरकारने पूर्ण कराव्या. याकडे लक्ष वेधण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुठल्याही परिस्थिती आरक्षण देण्यात येऊ नये. आधीच या प्रवर्गात ३५० जातींचा समावेश आहे. मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, पण, ओबीसींतून आरक्षण देण्यात येऊ नये, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले.