अकोला : माजी पंतप्रधान तथा माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थनीतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव राहिल्याचा सूर मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या सत्रात उमटला.

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४८ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात सोमवारी विविध सत्र पार पडले. पहिल्या सत्रात ‘डॉ. मनमोहन सिंग यांचे अर्थशास्त्रीय विचार’ या विषयावर प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थनीतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, जागतिकीकरण आणि उदारीकरणातील त्यांची भूमिका यावर सखोल चर्चा झाली. सहभागी वक्त्यांनी त्यांच्या धोरणांचा आजच्या आर्थिक परिस्थितीशी संबंध जोडत वास्तववादी विश्लेषण सादर केले. दुसऱ्या सत्रात ‘महाराष्ट्रातील व्यसनाधीनतेचे सामाजिक व आर्थिक पैलू’ या महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. या सत्रात सादर केलेल्या संशोधनांमधून व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणारी उत्पादकतेतील घसरण, कुटुंब व्यवस्थेवरील परिणाम आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा आर्थिक ताण यावर प्रकाश टाकण्यात आला.

या दोन्ही सत्रांना अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास खंदारे, स्थानिक कार्याध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, परिषदेचे कार्यवाहक खजिनदार डॉ. मारुती तेगमपुरे, अध्यक्ष डॉ. सुनील नरवडे व वृत्तलेखक डॉ. विश्वनाथ कुककर उपस्थित होते. तिसऱ्या सत्रातही ‘महाराष्ट्रातील व्यसनाधीनतेचे सामाजिक व आर्थिक पैलू’ या विषयावरील विद्यार्थी आणि संशोधकांचे सादरीकरण केले. चौथ्या सत्रात आर्थिक घडामोडींवर मुक्त चर्चा घेण्यात आली.

‘अमेरिकेचे प्रशुल्क धोरण : भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने व संधी’ या विषयावर प्राचार्य डॉ. दिनकर टकले (परतूर) आणि डॉ. प्रशांत हरमकर (अमरावती) यांनी आपली मते मांडली. सूत्रसंचालन डॉ. जयवंत इंगळे यांनी केले. अधिवेशनात राज्यभरातील प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

‘अर्थविषयक चर्चेतून समाजातील समस्यांवर उपाय शोधावा’

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटक म्हणून आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थिती होती. अर्थशास्त्राचे ज्ञान हे समाजाच्या विकासाचा पाया असल्याचे मत हर्षवर्धन देशमुख यांनी मांडले. अर्थविषयक चर्चेमधून समाजातील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा आमदार सावरकर यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. रामेश्वर भिसे यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. अनिता दुबे यांनी केले. आभार प्रा. धनंजय काळे यांनी मानले.