अकोला : ५१ वर्षीय सराफा व्यावसायिकाला ३० वर्षीय विवाहित महिला व तिच्या पतीने ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवले. बलात्कार केल्याची पोलीस तक्रार देण्याची धमकी देऊन आरोपी दाम्पत्याने व्यावसायिकाकडून तब्बल १८.७४ लाख रुपये उकळले. पैशांसाठी वारंवार तगादा लावण्यात येत असल्याने त्रस्त व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून एक लाखाची खंडणी घेतांना दोन्ही आरोपींना अटक केली.

अकोला शहरातील टॉवर चौकातील भारतीय स्टेट बँकेत १६ जून रोजी सराफा व्यावसायिक घनश्याम बालचंद सोनी (५१ वर्ष, रा.सोनी कॉलनी, रतनलाल प्लॉट, अकोला.) हे खात्यात पैसे टाकण्यासाठी गेले होते. यावेळी विवाहित महिला लता नितेश थोप (३० वर्ष, रा.खरब ढोरे, ता.मूर्तिजापूर) हिने सोनी यांच्याशी संवाद साधून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. महिलेने व्यावसायिकाशी अनेकवेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवर महिलेशी संवाद साधला. महिलेने, ‘पती चांगली वागणूक देत नाही व मला तुमच्याशी बोलायला आवडते’ असे सांगितले. ०२ जुलै रोजी महिलेने व्यावसायिकाला खरब ढोरे या तिच्या गावात बोलावले. व्यावसायिक तिच्या घरी गेल्यावर महिलेशी बोलत असतांना तिचा पती नितेश प्रभाकर थोप त्याठिकाणी आला.

‘माझ्या पत्नीसोबत येथे काय करत आहे?’ अशी विचारणा करून याने घराचा दरवाजा लावून घेतला. ‘माझ्या पत्नीशी जबरदस्ती केली, असे तुझ्या घरी फोन लावून सांगतो’ अशी धमकी दिली. पत्नीसोबत व्यावसायिकाचे छायाचित्र देखील काढले. तीन लाख रुपये लगेच देण्याची मागणी आरोपी दाम्पत्याने केली. बलात्कार केल्याची बदनामी करून पोलीस तक्रार देण्याची धमकी दिली. त्यामुळे व्यावसायिक घाबरला. त्यांनी सुरुवातीला आरोपींना तीन लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन रोख व ऑनलाइन स्वरूपात व्यावसायिकाकडून आरोपींनी १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणाची तक्रार २९ ऑगस्टला दाखल झाल्यावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०८ (२), ३०८ (६), ३ (५), भा. न्या.सं. २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी पुन्हा पाच लाखाची मागणी करीत होते. या प्रकरणात पोलिसांनी सापळा रचून आरोपींना व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी घेतांना मूर्तिजापुर ते अकोला मार्गावरील टोल नाक्याजवळ रंगेहात पकडले. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो. नि. श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. चंदन वानखडे करीत आहेत.