स्मारकासाठी निधी उपलब्ध, पण कार्यादेशच नाही; आज २८ वा स्मृतिदिन

नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनकाळात २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यानंतर झिरो माईल चौकात गोवारी स्मारक उभारण्यात आले. गोवारी बांधवांचा २८ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. मात्र, स्मारकासाठी निधी उपलब्ध असताना केवळ कार्यादेश नसल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे.

शहीद गोवारी बांधवांच्या स्मृती जपण्यासाठ झिरो माईलजवळ शहीद गोवारी स्मारक उभारण्यात आले. सीताबर्डी उड्डाणपुलाचे नामकरणही शहीद गोवारी पूल असे करण्यात आले. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर दरवर्षी २३ नोव्हेंबरला गोवारी स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या दिवशी ठिकठिकाणांहून गोवारी समाजबांधव अभिवादन करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात येतात. स्थानिक नेतेही आदरांजली अर्पण करून घोषणा करतात. मात्र, या घोषणांकडे स्मृतीदिन आटोपला की दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या गोवारी स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करून तो मंजूर करण्यात आला आणि निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षभरापासून कार्यादेश झाले नाही. त्यामुळे सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे.

या स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फरशा तुटलेल्या आहेत. वर्षभर तर स्वच्छतासुद्धा होत नाही. गोवासी स्मृतिदिन आला की प्रशासनाला जाग येते आणि तेथील स्वच्छता व रंगरंगोटी केली जात असल्याचे समोर आले आहे. स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी ३ लाखांचा निधी दिला जात असताना तो वाढवून देण्याची मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनाच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, त्या मागणी अजूनही मान्य झाली नाही. गोवारी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते, असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे १४ ऑगस्ट २०१८ मध्ये दिला. परंतु, सर्वच क्षेत्रांत संवैधानिक हक्क मिळतील, त्याच दिवशी खरा न्याय मिळेल, असे मत गोवारी समाजातील नेत्यांनी व्यक्त केले.

श्रद्धांजली कार्यक्रम उद्या

आदिवासी गोवारी समाज समाज संघटनेच्यावतीने उद्या बुधवारी २८ वा शहीद आदिवासी गोवारी श्रद्धांजली कार्यक्रम गोवारी शहीद स्मारक झिरो माईल येथे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गोवारी बांधवांनी श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहीद गोवारी स्मृतीदिनाच्या निमित्ताने विदर्भासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवारी बांधव येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या गोवारी स्मारकाचा सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव महापालिकेत आला होता आणि त्यासाठी ६० लाख निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र अजूनही कार्यादेश काढण्यात आले नाही. त्यामुळे सौंदर्यीकरण झाले नाही.

– कैलाश राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन