नागपूर: नागपूर, मुंबईसह राज्यभरात श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा केला गेला. राज्यातील बहुतांश भागात घरगुती गणपतींच्या मुर्तींचे विसर्जन करून भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला आहे. तर अनेत सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाकडूनही बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. हा उत्सव संपन्न झाला असतांनाच नागपुरात आता मस्कऱ्या (हडपक्या) गणपतींचे आगमन ९ सप्टेंबरला होणार आहे. या गणपती उत्सवाचा इतिहास आपण जाणून घेऊ या.
नागपुरात ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आगमन ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून या मूर्तीची स्थापना १० सप्टेंबरला होणार आहे. इ. स. १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. हा उत्सव सुरू करण्यामागे एक इतिहास आहे. त्यानुसार शुर लढवय्ये सरदार समशेर बहाद्दूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू) हे बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असतांना कुळाचारी गणपतीचे विसर्जण झाले होते.
दरम्यान बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरीता मसकऱ्या (हडपक्या) गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या, खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करुण हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. कालांतराने लोकमान्य टिळकांनी कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्काऱ्या (हडपक्या) गणपतीची चालू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले हे ‘महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट’ च्या व्यवस्थापनात व मार्गदर्शनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात.
यंदा उत्सवाचे २३८ वे वर्ष… हे आहे मूर्तीचे वैशिष्ट..
मस्कऱ्या (हडपक्या) उत्सवास यावर्षी २०२५ मध्ये २३८ वर्ष पूर्ण होत आहे. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांच्या काळात या गणपतीची १८ हाताची, २१ फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती. त्या अनुषंगाने तसी च मुर्ती १८ हाताची ७ फुटाची गणेशाची मूर्ती स्थापीत केली जाणार आहे. या गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे. आणी आजही बऱ्याच भक्तांना प्रचिती होत आहे. यंदा भोसले घराण्यातील या गणपतीची आगमन मिरवणूक ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सी. पी. ॲन्ड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून सुरू होईल. ही मिरवणूक जूनियर भोसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोसले चौक (सुतिका गृह) कोतवाली पोलीस स्टेशन चौक, नरसिंग टॉकिज चौक, सिनीयर भोसला पॅलेस अशी मार्गक्रमन करेल.