वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमेवर नाकाबंदी करण्यात येत आहे. सीमेवरून होणाऱ्या वाहतुकीवर सर्वेक्षण पथकाची करडी नजर असून शनिवारी कारंजा अमरावती मार्गावर धनज येथे एका चारचाकी वाहनातून सर्वेक्षण पथकाने ३६ लाख १६ हजार रुपयाची रोकड जप्त केली. यापैकी २० लाख रुपये संशयास्पद असल्यामुळे आयकर विभाग चौकशी करणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील सीमेवर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या दरम्यान अवैध वस्तू आणि पैशांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी जिल्ह्यात चेकपोस्ट लावण्यात आले असून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा…तुमच्याकडे कूलर लागलाय का?, मग ‘हे’ वाचाच….

गुरुवारी वाशीम-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या एका चेकपोस्टवर कारमधून १ लाख ८९ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी अमरावती कारंजा मार्गावर धनज सर्वेक्षण पथकाने एमएच २७ बी एक्स १०५६ या चार चाकी वाहनातून ३६ लाख १३ हजार रुपयाची रोकड जप्त केली.

हेही वाचा…दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्री, निवडणूक काळात…..

आढळून आलेली रक्कम बँकेची असल्याचे सांगण्यात आले. परंतु निवडणूक आयोगाने पैशांची देवाणघेवाण करताना बँकाना ठरवून दिलेल्या ‘अॅप’नुसार सखोल चौकशी केली असता २० लाख रुपये अधिकचे व संशयास्पद आढळल्यामुळे आयकर विभागाला सूचना देऊन चौकशीकरिता बोलविण्यात आले असल्याची माहिती आहे. तसेच मेडशी चेकपोस्ट येथेही ७ लाख रुपये आढळून आले आहेत.