चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांना ताडोबात तीन दिवसांच्या मुक्कामात एकूण १२ वाघांचे दर्शन झाले. तेंडुलकर दाम्पत्य व मित्र गेल्या आठवड्यात शनिवारी ताडोबामध्ये आले होते. तीन दिवस ताडोबाची भ्रमंती करून जवळपास १२ वाघांचे त्यांना दर्शन झाले. ताडोबात ‘मी पुन्हा येईन’ म्हणत त्यांनी प्रकल्पाचा निरोप घेतला.

तीन दिवसांच्या जंगल सफरीत कोलारा गेट, मदनापूर गेट, अलिझंझाजा गेटमधून सहा सफारी केल्या. प्रत्येक दिवशी त्यांना वाघ-वाघिणींचे दर्शन झाले. त्यापैकी भानुसखिंडी वाघीण व तिचे चार बछडे, बबली व तिचे तीन बछडे, छोटा मटका आणि इतर वाघांच्या दर्शनाने सचिन भारावला. सचिनची ताडोबा सफरीची ही चौथी वेळ होती. पहिल्या दिवशी ताडोबात त्याने मदनापूर बफर गेटमधून जंगल सफारी केली. या सफारीत सचिनला वाघाने हुलकावणी दिली.

हेही वाचा >>> नागपूर : बाबासाहेबांचा ४० फूट उंच पुतळा, १३० कोटींचा खर्च!, असे आहे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशी अलिझंझा प्रवेशद्वारातून सफारी केली. रामदेगी निमढेला परिसरात त्यांना भानुसखिंडी वाघीण व तिच्या चार बछड्याचे दर्शन झाले. शिवाय, बबली व तिचे तीन बछडे, छोटा मटका, बिबट, अस्वल पाहता आले. त्यानंतर त्याने अलिझंझा गेटमधून सफारी केली. या सफारीत त्यांना वाघ-वाघीण व बछडे हमखास दर्शन देत राहिले. दरम्यान, त्याने अलिझंझा व किटाडी येथील जि. प. शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी हितगूजही केली. ताडोबा मुक्कामानंतर निरोप घेताना सचिन व अंजली तेंडुलकर यांनी काही विद्यार्थ्यांना शालेय बॅग व गणवेश भेट दिले. अलिझंझा गावातून सफारीसाठी जात असताना सचिनने अलिझंझा व किटाडी जि. प. शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सचिन यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांना शालेय बॅग, बुट व गणवेश देणार आहेत.