राज्यभरातील विद्यार्थी चिंतेत

नागपूर : ‘एम.बी.ए.’ सीईटीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असतानाही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) विभागाने पदव्युत्तर व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू न केल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. प्रवेशासाठी विलंब होत असल्याने महाविद्यालये त्रस्त झाली असून त्यांच्या प्रवेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यंदा एम.बी.ए. प्रवेशासाठी १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान ‘सीईटी’ घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबरला जाहीर झाला. गेल्यावर्षी एम.बी.ए.ची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली होती. मात्र, यंदा नोव्हेंबर सुरू होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेशाची प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होण्यास किमान दीड महिना लागतो. त्यामुळे महाविद्यालयांकडून सत्रांत परीक्षांमधील वर्गांची संख्या वाढवावी लागते.  कधी सुट्ट्या कमी करून शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची कसरत केली जाते. याशिवाय विद्यापीठाकडून शैक्षणिक नुकसान भरपाईसाठी परीक्षेच्या वेळापत्रकाची उपाययोजना करावी लागते. त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यासक्रम करून परीक्षा देण्याचे दडपण विद्यार्थ्यांवर आहे. दुसरीकडे असे असताना, शैक्षणिक सत्र उशिरा सुरू झाल्याने त्याचे परिणाम पुढील दोन वर्षे भोगावे लागणार आहेत. याशिवाय निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत उशिरा सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत एम.बी.ए. अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यंदा राज्यातील ३६७  एम.बी.ए. अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये ५२ हजार जागा आहेत.

एम.बी.ए.ची सीईटी उत्तीर्ण झालेल्या काही विद्याथ्र्याने सांगितले की, निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. करोनामुळे आधीच शैक्षणिक सत्र लांबले आहेत. त्यात शिक्षण विभाग कुठलेही कारण नसताना प्रवेश प्रक्रिया लांबवत असल्याने सर्व चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना मनासारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे लवकर प्रवेश सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.