|| महेश बोकडे
जोखीम स्वीकारणाऱ्या स्वयंसेवकांत नाराजी
नागपूर : देशासाठी काही स्वयंसेवकांनी जोखीम स्वीकारत वैद्यकीय चाचणीत करोना प्रतिबंधक लस घेतली. स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना प्रथम लसीकरण प्रमाणपत्रही दिले नव्हते. लोकसत्ताने हा प्रकार पुढे आणल्यावर ते मिळाले. परंतु ही लस नागपूरला घेतलेल्यांना ती आसामच्या केंद्रात घेतल्याचे प्रमाणपत्रात दाखवले असल्याने स्वयंसेवकांत नाराजी आहे.
स्वयंसेवकांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर पहिली आणि दुसरी मात्रा घेतल्याची तारीख योग्य दर्शवली आहे. परंतु लस घेतलेल्या केंद्राचा पत्ता हा नागपूरच्या रहाटे सर्जिकल हॉस्पिटल या केंद्राच्या ऐवजी १ नं., बोरसोला एलपी स्कूल, लखीमपूर, आसाम असा आहे. त्यामुळे नागपुरातील या स्वयंसेवकांत नाराजी आहे. दरम्यान, भविष्यात तिसरा बुस्टर डोज घेण्याची वेळ आल्यास या प्रमाणपत्रावरून गोंधळ होऊ नये, अशी शंकाही त्यांना आहे. त्यातच प्रत्येक लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह कोविड जनजागृती संदेशही असतो. या प्रमाणपत्रावर मराठी नागरिकांना समजणाऱ्या मराठी, हिंदी अथवा इंग्रजीत ही जनजागृती अपेक्षित आहे. परंतु आसामचा पत्ता असल्याने तेथील भाषेत ही संदेश असून तो कुणालाही ते समजतही नाही, हे विशेष.
अशी झाली चाचणी!
भारत बायोटेककडून जुलै-२०२० मध्ये देशाच्या विविध केंद्रात पहिल्या टप्प्यात ३७५, सप्टेंबर २०२० मध्ये दुसऱ्या टप्प्यात ३७५, तिसऱ्या टप्प्यात देशात २५ हजार ८०० जणांवर कोव्हॅक्सिन लसींची चाचणी झाली. पहिल्या टप्प्यात नागपुरातील गिल्लुरकर रुग्णालय व रहाटे रुग्णालयातील केंद्र होते. चाचणीत लस प्रभावी असल्याचे स्पष्ट झाल्यावर पुढे देशात लसीकरण सुरू झाले.
डॉक्टर काय म्हणतात?
वैद्यकीय चाचणीसाठी दिलेल्या लसींच्या बॅचचा पुरवण्यात झालेल्या भागात स्वयंसेवकांची नोंद झाल्याने बहुदा त्यांना तेथील पत्त्यावर लसीकरण झाल्याचे नमूद झाले असावे. परंतु बुस्टर डोजची गरज भासल्यास त्यांना कुठेही लस घेता येईल, असे मत नागपुरातील पहिल्या टप्प्यातील कोव्हॅक्सिन चाचणीचे समन्वयक डॉ. आशीष ताजने यांनी सांगितले.
