यवतमाळ : नगर परिषदेच्या निवडणुकीत आजी आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा कस लागणार आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची कन्या आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने, ही निवडणूक आता केवळ स्थानिक राहिलेली नाही, तर ‘हायप्रोफाईल’ झाली आहे. या निवडणुकीत आदिवासी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.
मंगळवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर यवतमाळ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी १८ जणींनी, तर नगरसेवकपदांसाठी तब्बल ४५० इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. या संख्येमुळे आणि बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय समीकरणांना स्थानिक पातळीवर तडा गेला.
यवतमाळ नगराध्यक्षपद आदिवासी महिलेसाठी राखीव असल्याने, या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपने राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची कन्या अॅड. प्रियदर्शनी उईके यांना मैदानात उतरविले आहे. तर, काँग्रेसने राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका जितेंद्र मोघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यवतमाळात भाजप विरुद्ध काँग्रेस, अर्थात उईके विरुद्ध मोघे, असा ‘हायव्होल्टेज’ सामना रंगणार आहे.
या दोन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त इतर पक्षांनीही ताकदीने उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या (उबाठा) वतीने वैष्णवी नरेश कोवे, वंचित बहुजन आघाडीकडून चंचल संतोष मेश्राम, तर महायुतीतील घटकपक्ष असूनही शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी तेजस्विनी राजू चांदेकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार दिल्याने युतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्षपदाची ही निवडणूक आता सरळ ‘महायुती विरुद्ध महाविकास आघाडी’ अशी न होता, ती मिश्र आणि बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. ५८ जागांसाठी ४५० उमेदवार असल्याने बंडखोरीचा फटका सर्वांनाच बसणार असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
या निवडणुकीत आदिवासी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवार हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गजांच्या घरातील आहेत. त्यामुळे समाजाचा कौल कुणाकडे जातो, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. याशिवाय, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनीही उमेदवार दिल्याने आदिवासी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या हायप्रोफाईल लढतीत रंगत वाढली आहे.
माधुरी मडावी उमेदवार नाहीत, पण ‘स्टार प्रचारक’ !
यवतमाळच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी आपल्या आक्रमक आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी तांत्रिक बाबींमुळे त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्या शर्यतीतून बाहेर पडल्या. असे असले तरी, त्यांची लोकप्रियता आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व पाहता, काँग्रेस आता त्यांचा वापर ‘स्टार प्रचारक’ म्हणून करण्याची शक्यता आहे. मडावी यांचा करिष्मा काँग्रेसच्या मतांमध्ये रूपांतरित होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
