अमरावती : राज्यातील जनतेने २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला होता, पण त्यावेळी चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाशी दगाबाजी केली. त्यामुळे आमचे सरकार येऊ शकले नाही, अशी टीका मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आज येथे केली.

मोर्शी येथील शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समारंभाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, उमेश यावलकर, राजेश वानखडे, माजी खासदार रामदास तडस, नवनीत राणा आदी उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले, डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणामध्ये राहू-केतू यांच्यामुळे भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असे सांगितले, पण मी सांगतो, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार होते, पण चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्याने दगाबाजी झाली. आम्हाला जनादेश मिळाला होता, पण त्या लोकांनी हिंदुत्वाशी बेईमानी केली. मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन हे २०१९ मध्येच होणार होते, पण आता उशिरा का होईना भूमिपूजन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भाजपच्या सरकारच्या कारकीर्दीत ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन होते आणि भाजप सरकारच्या काळातच त्या प्रकल्पाचे उद्घाटन होते. त्यामुळे आता दोन वर्षांतच या महाविद्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, आताच त्यांची वेळ खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी घ्यावी, असे नितेश राणे म्हणाले.

महायुतीचे सरकार मत्स्यव्यवसायाला चालना देत आहे. येत्या काळात मच्छिमारांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. मासेमारी करणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये समृद्धी यावी, यासाठी सरकार काम करीत आहे. मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात जेवढे महत्व समुद्रातील मासेमारीला आहे, तेवढेच महत्व गोड्या पाण्यातील मासेमारीला आहे. यापुर्वी तलावातील मत्स्यउत्पादनाचा अंदाज येत नव्हता, कंत्राटदार किती उत्पादन घेत आहेत, हेही माहित होत नव्हते. या क्षेत्रात स्पर्धा झाली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या गोड्या पाण्याच्या मत्स्यउत्पादनात महाराष्ट्र देशात १६ व्या क्रमांकावर आहे. २०२९ पर्यंत आपले राज्य पहिल्या पाच क्रमांकामध्ये येईल, असा आमचा विश्वास आहे, असे नितेश राणे म्हणाले.