नागपूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचा उल्लेख करतात. चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला, अशी चर्चा केवळ भारताच्या नाही तर जगाच्या राजकारणातही केली जाते. गायक अनुप जलोटा यांनी नुकतेच एका मुलाखतीतही भविष्यात चहावाला बनायला आवडेल ,असे मिश्किल उत्तर दिले होते. चहावाला पंतप्रधान यावरून विरोधकांनी अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलताना चहाच्या दुकानाचा उल्लेख केला.ते काय म्हणाले पाहा.. गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की, शिक्षण ही आपली शक्ती आहे.

शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. आज अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान ,अशी छोटी कामे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये चांगले कला कौशल्य असूनही केवळ शिक्षणा अभावी ते मागे पडलेले आहेत. त्यामुळे सगळ्या भाषांचे शिक्षण घ्यावे ,असे आव्हान त्यांनी केले. शिक्षण घेत असताना पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला खूप गुण मिळाले म्हणजे तुम्ही यशस्वी झाला , तसे नाही. मी विधी अभ्यासक्रमाला असताना मागच्या बाकावर बसणारे आज मोठे वकील झाले तर गुणवत्ता यादीत आले नाही असेही गडकरी म्हणाले.

चहावाल्याची चर्चा काय?

आपण कुठली पदवी घेतो हे महत्त्वाचे नाही. तर त्या शिक्षणाचा वापर आपण कसा करू शकतो हे महत्त्वाचे आहे. शिक्षणामध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे. या कौशल्याच्या जोरावरच आपण पुढे जाऊ शकतो. आज कौशल्य असल्यामुळे एका पंचतारांकित हॉटेलमधली शेफ लाखो रुपये पगार कमावू शकतो. मुस्लीम समाजातील अनेक विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्याकडे चांगले कौशल्य आहे. त्यांनी या कौशल्याचे योग्य शिक्षण घेतले तर ते समोर जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही दिवसातून पाचदा नाही तर शंभर वेळा नमाज पठण करा.

मात्र, शिक्षणापासून दूर जाऊ नका. अन्यथा आयुष्यभर तिच चहाची टपरी, ट्रक ड्रायव्हर, पंचरवाल बनून राहाल. त्यामुळे शिक्षणला महत्त्व द्या. तुमचे ज्ञान कुणीही चोरून नेऊ शकत नाही. तुमच्यामध्ये जिद्द असेल तर प्रत्येकाला वाकवू शकता, असेही गडकरी म्हणाले.या भाषणानंतर गडकरींनी चहावाल्याचे उदाहरण दिल्याने हे भाषण चांगलेच चर्चेत आले होते. चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, मग या व्यवसायात वाईट काय?, अशीही चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती.