वर्धा: आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील कलगीतुरा थांबण्याचे नावच घेत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांची आगामी उमेदवारी डोळ्यापुढे ठेवून सुरू झालेली विकास कामांची एक्सप्रेस विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या चांगलीच जिव्हारी लागत आहे. तसे टोले त्यांनी अनेक कार्यक्रमातून लगावले.
आर्वी भाजपतर्फे आयोजित दिवाळी मिलन सोहळ्यात केचे पुन्हा बरसले. म्हणाले की गावागावात भाजप शिरण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. तेव्हा आज हिरवळ दिसत आहे. आज म्हणूनच कार्यकर्ता भाजपच्या पाठीशी उभा आहे. जर ‘ दादाराव ‘ सोबत नसेल तर या मतदारसंघात भाजपचा बुरुज ढासळल्या शिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा केचे यांनी देऊन टाकला. पुढे आणखी कमाल केली. येणारी विधानसभा मीच लढणार, माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी खडसावून सांगितले.
हेही वाचा… “विदर्भात ९० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे काय झाले?” प्रदीप माहेश्वरी यांचा सवाल
एकप्रकारे पक्षश्रेष्ठींना आव्हान देत त्यांनी उमेदवारीच घोषित करून टाकली. वानखेडे हे फडणवीस यांचे दूत असल्याचे स्पष्ट आहे. म्हणून केचे यांचे वक्तव्य थेट फडणवीस यांनाच आव्हान असल्याची चर्चा उसळली. विशेष म्हणजे यावेळी संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, खासदार रामदास तडस व पक्षाचे अन्य बडे पुढारी उपस्थित होते. काही दिवसापूर्वी वानखेडे यांनी असाच दिवाळी सोहळा आयोजित केला होता. त्यास केचे पण उपस्थित होते.या ठिकाणी मात्र वानखेडे यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना जाणवली.