शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची गरज नाही, हे मतदारसंघ रद्द करा, असे वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा भाजपचेच शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. त्यांची तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> वर्धा : कारंजा घाडगेजवळ पोलिसांकडून २६ लाखांचा गांजा जप्त

शिक्षकासंदर्भातील आ. प्रशांत बंब यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप चांगलीच अडचणीत आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने बंब यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच आता खुद्द भाजपमधूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी बंब यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भारतीय जनता पक्षाची अशी भूमिका नाही. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेविरुद्ध पक्षाचाच एक आमदार अशी काही मागणी करीत असेल तर ते पक्षशिस्तीत बसणारे नाही. पक्षाने बंब त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गाणार यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले व नेते झाले. ही बाब कुणीतरी आमदार प्रशांत बंब यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. त्यांनी शिक्षकांचा अपमान करणारे वक्तव्य महाराष्ट्राच्या विधानसभेत केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रात, शिक्षक संवर्गात उमटत आहेत. भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बंब यांना समज द्यावी, असे गाणार म्हणाले.