आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही यात्रा काढण्यापूर्वी नितीन देशमुख यांनी परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हेही वाचा – अकोला: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण…

“मी मरेन पण जामीन घेणार नाही”

यासंदर्भात बोलताना नितीन देशमुख यांनी नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले. “पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार नाही. मी मरेन पण जामीन घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकार असताना खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर तालुक्यातील ६९ गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यासाठी वान धरणातील पाणी ६९ गावे पाणी पुरवठा योजननेसाठी आरक्षित करण्यात आली. मात्र, याला तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या स्थगितीसाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. फडणवीसांनीही या पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिली. यावरून आता आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवावी, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे.