अ‍ॅड. मा.म. गडकरी यांना समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान नाही आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा नाही, हे सर्वच सरकारमध्ये चालते. याला आमचे सरकारही अपवाद नाही, अशा शब्दात सत्ताधाऱ्यांच्या वैचारिक समानतेबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले.

[jwplayer vtVpMCjf]

मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ गांधीवादी अ‍ॅड. मा.म. गडकरी यांना प्रदान करण्यात आला. शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलात रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार कृपाल तुमाने, मारवाडी फाऊंडेशनचे गिरीश गांधी, आमदार मितेश भांगडीया व्यासपीठावर होते.

आजच्या राजकारण्यांचा समाजकार्याशी काही संबंध नाही. निवडणूक जिंकणे म्हणजे राजकारण, हे अलिकडेच चित्र आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, असेही ते म्हणाले. गडकरी नेहमीप्रमाणे तासभर विलंबाने कार्यक्रमाला आले. त्यांचे आगमन झाले तेव्हा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे भाषण संपायला आले होते. ते म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला होते. मैलाचे दगड रंगवण्याचे काम ते करीत होते. तोच कुंचला नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती आला आणि त्याच बाळासाहेबांनी भाजपला ‘कमळाबाई’ असे नाव दिले होते, याचा आवर्जुन उल्लेख भावे यांनी केला. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित मंडळी मोठय़ा संख्येने, तसेच अ‍ॅड.मा.म. गडकरी यांची पत्नी, मुली, जावई उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने मंडळी जमल्याने अनेकांना उभे राहावे लागले. काही वेळ वीज पुरवठा खंडीत झाल्याने कार्यक्रमात व्यत्यय आला होता.

अ‍ॅड.मा.म. गडकरींचे सरकारला खडेबोल

सरकार गरीब, पीडित, खालच्या स्तरातील माणसाचा विचार करताना दिसत नाही. विकासाचे पाश्चिमात्य मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. खेडय़ापाडय़ात रस्ते, पाणी, रोजगार मिळायला हवे. याचा विचार केला जात नाही. राजकारण्यांकडून सत्ता मिळवायची आणि त्यातून पैसा कमवायचा, एवढाच उद्योग सुरू आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अ‍ॅड.मा.म. गडकरी यांनी व्यक्त केले.

[jwplayer VwmkQGEJ]

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mm gadkari get samaj prabodhan award
First published on: 21-11-2016 at 02:58 IST