महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)ने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रवाशांकरिता मोबाईल अॅपद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता मोबाईलवरच प्रवाशांना ‘एसटी’चे तिकीट घेणे शक्य होईल.
राज्यभर दररोज हजारोंच्या संख्येत एसटी बसेस धावत असतात. या बसेस शहरांपासून आदिवासी पाडे, मागास गावांसह इतरही भागात नित्याने फेऱ्या मारत असल्याने त्यात लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना अद्यावत सुविधा देण्याकरिता एक मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप मे. ट्रायमॅक्स आय टी इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सव्र्हिसेस लि.ने तयार केले आहे. मोबाईल अॅप द्वारे आरक्षणाचा वापर करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी अॅन्ड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरून एमएसआरटीसी मोबाईल रिझर्वेशन अॅप डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशाने नोंदणी करणे गरजेचे आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे तिकिटाच्या आगाऊ आरक्षणासाठी नेट बँकींग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमएसआरटीसी मोबाईल रिझर्वेशन अॅपद्वारे प्रवाशांना त्यांच्या सोईचा आसन क्रमांक, बससेवा प्रकार, बसफेरीची वेळ, प्रवाशांचे चढण्याचे/ उतरण्याचे ठिकाण इत्यादी बाबी निवडता येतील. राज्य परिवहन बसमधून प्रवाशांनी तसेच प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनी या मोबाईल अॅपचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या अॅपमुळे आगाऊ आरक्षणासाठी नागरिकांना बसस्थानकावर जाण्याची डोकेदुखी कमी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
‘एसटी’चे आगाऊ आरक्षण आता मोबाईल अॅपद्वारे
एमएसआरटीसी मोबाईल रिझर्वेशन अॅप डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशाने नोंदणी करणे गरजेचे आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-07-2016 at 03:04 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile app for advance reservation of st buses