कर्मचारी कपातीने रक्तदात्यांपर्यंत पोहचणे कठीण; जागतिक रक्तदाता दिन विशेष
शासनाकडून राज्यात रक्तदान वाढवण्यासाठी विविध घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेकडून मेडिकलच्या मोबाईल रक्त संग्रहण व्हॅनमधील दोन कर्मचाऱ्यांची कपात करण्यासह आणखी एक कर्मचारी कपातीचे संकेत देत चालू योजनेत खोडा घातला जात आहे. कर्मचारी कपातीने मोबाईल रक्त संकलन व्हॅनचे शिबीर कमी होऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांपर्यंत पोहचणे कठीण होईल. १ ऑक्टोबरला जागतिक रक्तदाता दिन पाळला जात असून या पाश्र्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेचा नाठाळपणा समोर आला आहे.
मेडिकलमध्ये वर्षांला २० हजार रक्त पिशव्यांची गरज असताना येथील रक्तपेढीत वर्षांला १३ हजार पिशव्या रक्त संकलित होते. मध्य भारतातील शासकीय रक्तपेढीतील ही सर्वाधिक संख्या असल्याने येथील रक्तपेढीला आदर्श रक्तपेढीचा दर्जा आहे. मेडिकलमध्ये रक्तसंकलन वाढावे म्हणून राज्य व केंद्राच्या रक्त संकलन परिषदेने येथे २०१० मध्ये सव्वा कोटींची अद्ययावत मोबाईल रक्त संकलक व्हॅन उपलब्ध केली. सोबत २ तंत्रज्ञ, १ मदतनीस, १ लिपिक, १ समुपदेशक, १ व्हॅन चालकही उपलब्ध केले गेले. सर्वाचे वेतन महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेकडून (एम- सॅक) दिले जाते.
प्रकल्पानुसार व्हॅनसाठी वर्षांला १ लाख १४ हजार रुपये इंधनासाठी, दीड लाख रुपये व्हॅनच्या देखभाल- दुरुस्तीसाठी तर त्याचे इतरही खर्च एम- सॅककडून उचलले जात होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रथम एम- सॅकने या व्हॅनच्या इंधन देणे बंद केले. तर दहा दिवसांपूर्वी या व्हॅनसोबत दिलेले १ समुपदेशक आणि १ मदतनीस कमी करून त्यांना डागा शासकीय रुग्णालयात बदलीवर पाठवले. दरम्यान, आणखी एका तंत्रज्ञालाही डागात पाठवण्याचे संकेत असून त्याने रक्त संकलन व्हॅनचे शिबीर कमी होऊ शकतात. सध्या मेडिकलच्या रक्तपेढीकडून एकाचवेळी दोन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीर आधी कर्मचारी उपलब्ध करून आयोजित केले जातात.
कर्मचारी कपातीने शिबिरांवर मर्यादा येऊन रक्तदान कमी होईल. त्यामुळे रक्तदानासाठी दाते तयार असतानाही मेडिकलच्या रक्तपेढीला तिथपर्यंत पोहचता येणार नाही. या विषयावर रक्तपेढीचे डॉ. संजय पराते यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
निम्मे रक्त संकलन मोबाईल व्हॅनने!
मेडिकलच्या रक्तपेढीत वर्षांला १३,००० जणांकडून रक्तदान केले जाते. प्रत्येक रक्ताचे घटक वेगवेगळे करून त्याचा लाभ येथील सुमारे ३५ ते ४० हजार रुग्णांना दिला जातो. एकूण रक्तदानापैकी सुमारे ५ हजार रक्त पिशव्या रक्त संकलन मोबाईल व्हॅनच्या मदतीने आयोजित शिबिरातून गोळा केली जाते.
मेडिकलच्या पत्राला प्रतिसाद नाही
मेडिकल प्रशासनाने एम- सॅकला पत्र पाठवून कर्मचारी कपात न करण्याबाबत विनंती केली होती. त्यात येथील शासकीय रक्तपेढीचा व्याप मोठा असून कर्मचारी कपातीने रक्त संकलनात कमी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु एम- सॅकने या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
‘‘अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेडिकलच्या रक्तपेढीने १३ हजार पिशव्या रक्त संकलनाचा उच्चांक गाठला असून ही संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे. एम- सॅकने काही कर्मचारी कमी केले असले तरी ते वाढवण्याची विनंती प्रशासनाने केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.’’ – डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर</strong>