चंद्रपूर: उन्हाळा बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) मध्ये जंपिंग सफारी वाहनांची संख्या १५ इतकी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे पर्यटकांना अधिक सुलभ आणि उत्तम सफारीचा अनुभव मिळेल. ताडोबा प्रशासनाने कोलारा गेट येथून १० खुटवंडा गेट येथून ४आणि झरी गेट येथून १ वाहनाला परवानगी दिली आहे. ताडोबाच्या विविध रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या आणि जंगल सफारीचा आरामदायी अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हा निर्णय विशेष फायदेशीर ठरणार आहे.
ताडोबात वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक आहे, त्यामुळे ते वन्यजीव प्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे.ताडोबा प्रकल्पात जंपिंग सफारी वाहनांची संख्या वाढल्याने पर्यटकांना सहज सफारी उपलब्ध होईल. त्यामुळे पर्यटकांचे सफारी मिळाली म्हणून समाधान होईल. शिवाय ताडोबाच्या इको-टूरिझमलाही चालना मिळेल. यामुळे स्थानिक मार्गदर्शक, चालक आणि पर्यटनाशी संबंधित इतर लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल.वन्यजीव प्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे, कारण ते आता वाघ, बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रे आणि इतर वन्यप्राण्यांचे अधिक बारकाईने निरीक्षण करू शकतात. ताडोबा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ताडोबा देशातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळांमध्ये निश्चितच लोकप्रिय होईल.
जंपिंग सफारी वाहने काय आहेत
जंपिंग सफारी वाहने ही खास डिझाइन केलेली जिप्सी आहेत,. ज्यात आरामदायी आसन, उन्ह व पाऊस या पासून बचावासाठी छतावर शेड्स आणि उत्तम आसन व्यवस्था आहेत. ही वाहने ताडोबाच्या क्षेत्र संचालकांकडे नोंदणीकृत आहेत आणि जेव्हा पर्यटकाने सफारीचे ऑनलाइन बुकिंग केले असेल तेव्हाच त्यांना परवानगी दिली जाते. पर्यटकांना रिसॉर्टचे जिप्सी वाहनाने सफारी करायची असल्यास सामान्य जिप्सी भाड्याचे संपूर्ण शुल्क भरावे लागते आणि सफारी गेटवर १००० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागते तसेच विभागीय मार्गदर्शकासह वाहनात वनविभागाचे बघेरा ॲप दिलेले असते, जेणेकरून त्यांचे वाहन पर्यटन मार्गावरून जात आहे की नाही हे पाहता येईल. तसेच, जंपिंग सफारी वाहनाने वनविभागाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असून, कोणी नियम मोडल्यास त्या जंपिंग वाहनाला निलंबित केले जाऊ शकते किंवा नोंदणी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार वनविभागाला आहे.
जंपिंग सफारी वाहनांची सुविधा मिळालेले रिसॉर्ट्स
बांबू फॉरेस्ट सफारी रिसॉर्ट – ३ वाहने
स्वासरा रिसॉर्ट – २ वाहने
ट्री हाऊस रिसॉर्ट – ४ वाहने
लिंबन रिसॉर्ट – २ वाहने
वाघोबा इको लॉज – २ वाहने
रेड अर्थ रिसॉर्ट – २ वाहने