नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सक्त वसुली संचालनालयातर्फे (ईडी) होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सदबुद्धी दे भगवान… असे भजन गायन करून आंदोलन केले.

 नागपूर शहर काँग्रेसने बुधवारी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला. सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स येथील ईडी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महात्मा गांधी यांचे आवडते भजन रघुपती राघव राजाराम सबको संमती दे भगवान हे भजन यावेळी आंदोलकांनी गायले. पोलिसांनी हा मोर्चा ईडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवला. त्यानंतर आंदोलक प्रवेशद्वारासंमोर ठाण मांडून बसले. यावेळी मोदी, भाजप को सदबुद्धी दे भगवान… या भजनातून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली.  या आंदोलनात शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, ॲड. अभिजीत वंजारी, अतुल लोंढे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, विशाल मुत्तेमवार, नश अली, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, नंदा पराते उपस्थित होते. हे आंदोलन सुमारे ४५ मिनिटे सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.