RSS Chief Mohan Bhagwat on Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं. तसेच रशियाकडून खजिन तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत भारतावरही तब्बल ५० टक्के कराचं (टॅरिफ) ओझं टाकलं. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारताला टॅरिफच्या मुद्यांवरून डिवचण्याचाही प्रयत्न केला. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला सुनावले आहे.
नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरसंघचालक भागवत म्हणाले की, मनात जर आपलेपणाचे भावना असेल तर सुरक्षेचा प्रश्नच येत नाही. कारण कोणीही आमचा वैरी नाही. दुसरा मोठा झाला तर माझं काय होईल ही भीती जगातील इतर देशांच्या मनात आहे. भारत जर मोठा झाला तर आमची स्थिती अशी असेल, आमचे काय होईल ही भीती जगातील काही देशांच्या मनात असल्यामुळे त्यांनी आपल्यावर टॅरिफ लागू केला जात आहे.
तुकाराम महाराज म्हणत होते, कोणी वंदा कोणी निंदा | आम्हा स्वहिताचा धंदा. जगाचे भले करणे यात आमचे स्वहित असून तो आमचा स्वार्थ आहे. मात्र स्वतःला शरीर मन. बुद्धीत कैद करून बसले तर हेच माणसा माणसातील आणि देशा – देशातील भांडणाचे कारण ठरते. मला काय हवे हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो आणि जगाला काय द्यायचे याचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे आपलेपणाची भावना असेल तर कोणातच वाद निर्माण होणार नाही. भारताने कधीच या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही. मात्र भारतावर दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. सात समुद्र दूर असणाऱ्या या देशांमध्ये मी पणाच्या भावनेतून भारताविषयी भीती आहे. आपण सर्व एक आहोत सर्वांचे कल्याण करण्यातच आपले भले आहे ही भावना जेव्हा इतरांना समजेल तेव्हा या समस्या दूर होतील.
प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. शरीर असल्यामुळे मी पणाची भावना राहणारच आहे. परंतु, मी कोण आहे याची जेव्हापर्यंत ओळख होत नाही, तेव्हापर्यंत समस्या दूर होऊ शकत नाही. ही भावना इतर देशातील लोक जेव्हापर्यंत समजणार नाही तेव्हापर्यंत आपल्या समस्या दूर होणार नाही. राष्ट्र म्हणून भारताला एक स्वतःची ओळख आहे. आम्हाला काय करायचे हे आम्हाला माहिती आहे. माणसाला अनेकदा ज्या समस्या निर्माण होतात त्यावर उपाय शोधणे, ते दूर करणे हेच आमचे कर्तव्य आहे. हे भारताला माहिती आहे. त्याच्यासाठीच आमचा निर्माण झालेला आहे. ही भावना आता प्रत्येक भारतीयामध्ये जागृत करणे आपले काम आहे. त्यामुळे आमचे कर्तव्य काय भारताला नक्की माहिती आहे.
आज मी सरसंघचालक असल्यामुळे माझ्या भाषणाला महत्त्व आहे. त्यामुळे आपण सगळे निमुटपणे भाषण ऐकत आहात. जगामध्ये ही ज्या व्यक्तीला महत्त्व आहे त्याचेच सगळे ऐकतात. त्यामुळे सगळे आपले वेगळा अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण स्वतःला मोठा करण्यासाठी लढत असतात. मात्र हे करत असताना शक्तिशाली देशही स्वतःला मोठे करण्यासाठी इतरांना कमजोर करण्याचा कुचशीत प्रयत्न काही देशांकडून सुरू असतो. वर्तमान काळाव्यतिरिक्त आपण प्राचीन काळाचाही विचार केला असता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळे विचारांच्या लोकांनीही भारताला शक्तिशाली आणि मोठे करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचा उद्देशही आपल्याला जगाला काहीतरी द्यायचे म्हणून भारताला मोठे बनवणे हाच होता.
भारताला काही बनायची गरज नाही. भारत आधीपासूनच सर्वव्यापी आणि शक्तिशाली आहे. भारतामध्ये राहणाऱ्या लोकांना आता सर्वव्यापी आणि शक्तिशाली बनवायचे आहे. व्यक्तीमध्येवशील आणि चरित्र निर्माणाचे काम ब्रह्मकुमारी करतात. माणसाच्या आतमध्ये असलेल्या दैवत्वाला जगण्याचं काम ब्रह्मकुमारी करतात. संघाचे काम याप्रमाणेच आहे. १४२ कोटीं लोकसंख्येचा आपला देश आहे. यात विविध धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. या सर्वांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यामुळे आज देश भक्कमपणे उभा आहे असेही सरसंघचालक म्हणाले.