नागपूर:  विद्यापीठात राजकीय क्षेत्रापेक्षा जास्त राजकारण आहे. कारण येथे सगळेच शिकलेले राजकारणी आहेत. राजकीय क्षेत्रात कमी शिकलेले आहेत. विद्यापीठातील राजकारण हे शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन रविवारी सकाळी करण्यात आले. कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके, विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे आदी उपस्थित

होते.

विद्यापीठाकडे खूप जागा असून या जागेवर अतिक्रमण होत आहे. यामुळे ती आधी सांभाळा आणि विद्यापीठाला जमत नसेल तर मला सांगा, असा सल्ला दिला. या जमिनीचे रक्षण करता येत नसेल तर मला सांगा. पदवीधर मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करताना विद्यापीठाची जागा वाचवण्यासाठी लढलो, आणखी लढेन. गेल्या १५ ते २० वर्षांपासून सिंथेटिक ट्रॅकची मागणी होती.  तो आता ८ कोटी खर्च करून तयार  केला जात आहे.

विद्यापीठ परिसरात वृक्ष लावले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शहरात अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरचे काम लवकरच सुरू होईल. तेलगंखेडी उद्यानात जागतिक दर्जाचे फाउंटेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी विद्यार्थ्यांची  मदत घेऊन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.