शैक्षणिक वातावरणाचा भंग वसतिगृहे की शैक्षणिक कोंडवाडे

एकेकाळी मॉरिस कॉलेजचे वसतिगृह आणि श्रीमंतीची जाणीव हे समीकरणच होते. मात्र, हल्ली या वसतिगृहाची श्रीमंती तेथे सुरू असलेल्या विकास कामांमुळे लयास गेली आहे. अभ्यासाचे वातावरण, निसर्गरम्य परिसर आणि सर्व सोयीसुविधा असलेल्या या वसतिगृहाला आता कोलाहलाने घेरले आहे.

नागपुरातील सर्वात कमी खर्चाचे वसतिगृह म्हणून त्याची ओळख आहे. मागावर्गीय विद्यार्थ्यांंचे वर्षांचे शुल्क केवळ १५०२ रुपये तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५०२ रुपये भरावे लागतात. त्यातही ४८० रुपये अनामत रक्कम असते. वसतिगृह परिसरात विकास कामे सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची गर्दी आणि  त्यांच्या आवाजाने रात्रीची शांतता भंग होऊन मुलांना अभ्यासच करता येत नाही, अशी विद्यार्थ्यांची मुख्य आणि रास्त तक्रार आहे.

पदव्युत्तर मुलांच्या वसतिगृहा शेजारीच औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारा विद्यापीठातील हा एकमेव विभाग आहे. शिवाय या अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमता कमी असल्याने विद्यार्थ्यांची कायम गर्दी असते. त्यामुळे वसतिगृहाची गरज या शाखेच्याही विद्यार्थ्यांना असते. याही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना याच समस्यांना सतत तोंड द्यावे लागते.

विद्यापीठाचे ‘लोअर होस्टेल’ एक संवेदनशील वसतिगृह म्हणून ओळखले जाते. बेकायदेशीर विद्यार्थी त्या ठिकाणी राहत असत आणि अनियमिततांचा बोलबाला असायचा. मात्र गेल्यावर्षीपासून कठोर भूमिकेमुळे बेकायदेशीर मुले बाहेर काढण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश आले. ३९० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना ‘वाय-फाय’ सेवा पुरवली जाते, अशी फुशारकी विद्यापीठाद्वारे मारली जाते. मात्र, केवळ ‘२०एमबी डाटा’ विद्यार्थ्यांना पुरवला जातो. त्याचा काहीही उपयोग त्यांना होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृहे सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजीही याठिकाणी घेतली जावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र लोअर वसतिगृहात व्यायामशाळा, वॉटर कुलर, प्युरिफायर, क्रीडांगणे नाहीत, अशी विद्यार्थ्यांची ओरड आहे. कित्येक वर्षांपासून इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाल्याने अनेकअडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते.

आम्ही येथे केवळ विद्यार्थी आहोत. एक म्यानमारचा आणि आणखी दोघे असे दोन खोल्यांमध्ये राहतात. एक विद्यार्थी पीएच.डी. करण्यासाठी धारणाधिकार रजेवर याठिकाणी आला आहे. तीन महिन्यांपूर्वी कुत्र्यांची पिले अगदी खोल्यांमध्ये जावून मनसोक्त उडय़ा मारीत आणि तेथेच घाण करीत असत. आता ते वसतिगृहाच्या इमारतीच्या बाहेर परिसरात खेळतात. स्वच्छतेच्या नावाने तर बोंबाबोंब आहे. कारण सफाई कर्मचारी नाहीच. कधी येतो. कधी नाही. आमच्या गरजेपुरता आम्ही याठिकाणी स्वच्छता करून घेतो. पण, पूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे अशक्य आहे.  – एक विद्यार्थी, नेलसन मंडेला आंतरराष्ट्रीय वसतिगृह

 

आंतरराष्ट्रीय वसतिगृह ओसाड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय वसतिगृह आहे पण ते नावालाच! याठिकाणी माणसे कमी आणि मुकी जनावरेच मोठय़ा संख्येने दिसतात. वसतिगृहाच्या दोन सुसज्ज इमारती रामनगर भागात आहेत. त्यातील एक ओसाड पडली असून विद्यापीठ इतर कामांसाठी त्या इमारतीचा वापर करते. तर दुसऱ्या इमारतीत जेमतेम तीन विद्यार्थी आहेत. बौद्ध संस्कृतीच्या अध्ययनासाठी पूर्वी परदेशातून बरेच विद्यार्थी या वसतिगृहात येत असत मात्र, आज एक म्यानमारचा विद्यार्थी सोडल्यास वसतिगृहातील इतर खोल्या रिकाम्या पडल्या आहेत. वसतिगृहात कुत्र्यांच्या पिलांचे साम्राज्य आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर मुलांची दोन आणि औषधनिर्माणशास्त्र विभागाचे एक वसतिगृह गुरुनानक भवन येथे आहे. याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्याही कायम तक्रारी असतात. वसतिगृह दुरून सुंदर असली तरी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची किंवा सफाई कामगाराची कायम समस्या आहे. वाय-फाय असणारे हे वसतिगृह आहे. मात्र वसतिगृहात वर्तमानपत्रे वाचायला मिळावीत, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही.