नागपूर: उपराजधानीत डासांची संख्या वाढत असून डेंग्यू सदृष्य रुग्णही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेकडून घरो- घरी सर्व्हेक्षनाला गती देण्यात आली. त्यात ७ हजार ९८६ घरातील वास्तव बघून महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षणाला आशांच्या सहभागामुळे गती मिळाली आहे. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणमध्ये आतापर्यंत १४६५०९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यात ७ हजार ९८६ घरांमध्ये डासांचा लारवा आढळला. या लरवामुळे डास उत्पत्ती वाढते. सध्या पारेषण काळ असल्यामुळे डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे महापालिकेतील १०८८ आशा सेविकेद्वारे झोनस्तरावर प्रभागनिहाय सर्व्हेक्षण सुरू केले गेले.

दरम्यान घरो- घरी डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी कुलरची टाकी, कुंड्या, भांडी, ड्रम, खराब तयार, घराच्या छतावर ठेवलेल्या टाकाऊ पण पाणी जमा होऊ शकणाऱ्या वस्तू तपासल्या जात आहे. त्यात डासोत्पत्ती स्थाने आळल्यास ती नष्ट केली जात आहे. दरम्यान महापालिकेकडून शहरात नियमितपणे धूर फवारणी वाहन आणि मनुष्यबळाद्वारे फवारणी आणि स्प्रेइंग केली जाते. शिवाय नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत देखील जनजागृती केली जात असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

यासोबतच शहरातील वस्त्या, मोकळे भूखंड आणि घरोघरी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर देखील भर दिला जात आहे. परिसरात आढळलेल्या डासांचे देखील परीक्षण करून ते कुठल्या आजाराचे संप्रेरक आहेत याची देखील शहानिशा केली जाते. परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी आणि स्प्रेइंग केली जाते. खुल्या भूखंडामध्ये पाणी साचलेले आढळल्यास तिथे डास अळीनाशक तेल (एमएलओ ऑईल) टाकून डास अळी नष्ट करण्याची कार्यवाही केली जात असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.

चार दिवसांमध्ये ८५३ घरात लारवा..

महापालिकेच्या दहाही झोनमध्ये ९५ ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे १ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत २०८७६ घरांचे सर्वेक्षण झाले. त्यात ८५३ घरांमध्ये लारवा आढळला. तर या दोन दिवसांत आशा द्वारे १ लाख २५ हजार ६३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यातील ७ हजार १३३ घरांमध्ये डासांचा लारवा आढळून आला. याशिवाय ‘ब्रिडिंग चेकर्स’ व आशा सेविकांद्वारे घरांमधील कंटेनर (डासोत्पत्ती होणारी साहित्य) सर्वेक्षण करण्यात आले. यात ‘ब्रिडिंग चेकर्स’ ने २६ हजार ९९२ कंटेनरची तपासणी केली त्यातील ४१५ दूषित आढळून आली. तर आशा सेविकांद्वारे ४९६८८ कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यातील २१६० कंटेनरमध्ये लारवा आढळला. ‘ब्रिडिंग चेकर्स’ व आशांद्वारे एकूण ७६ हजार ६८० कंटेनरची तपासणी केली असून त्यातील २ हजार ५७५ घरे दूषित आढळली.

डेंग्यूचे ९ रुग्ण आणि चिकनगुनियाचे ३ रुग्ण..

शहरात १ जुलै २०२५ पासून आजपर्यंत डेंग्यूचे ९ आणि चिकन गुनियाचे ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी सर्वेक्षाणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.