मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. शासकीय वसतीगृहात घुसून विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानापासून अगदी जवळच बुधवारी वाहत्या रस्त्यावर भर दिवसा जावयानेच सासूचा गळा चिरून खून केला. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हा खून होताना पाहिले. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांनी गुन्हेगारांना कायद्याचे भय उरलेले नसल्याचेही दिसत आहे.
उसने दिसेले पैसे परत करत नसल्याने संतापलेल्या जावयाने भर दिवसा सावत्र सासूला रस्त्यात गाठत पाठीमागून गळा चिरून तिचा खून केला. अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेला वेस्ट हायकोर्ट दुपारी दोनच्या सुमारास हे खूनी थरारनाट्य घडले. जवाहर वसतीगृहाला लागून असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटसमोर पदपथावर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून परिसरात घबराट निर्माण झाली.
माया पसेरकर असे भर दुपारी गळा चिरून खून झालेल्या ५८ वर्षीय महिलेचे नाव आहे. माया या जवाहर विद्यार्थी गृहाच्या पाठीमागे राहतात. त्या जवळच्याच एका बंगल्यात घरकाम करत होत्या. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास त्या कामावरून घरी परतत होत्या. याच दरम्यान मागावर असलेल्या सावत्र मुलीच्या नवऱ्याने पाठीमागून वार करत त्यांचा गळा चिरला.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या सुगावांच्या आधारे पोलिसांनी माया पसेरकर यांची सावत्र मुलगी गीता हीचा नवरा मुस्तफा खान मोहम्मद खान याला अटक केली. मुस्तफा हा गीताचा तिसरा नवरा आहे. गीताचा यापूर्वी दोन वेळा विवाह झाला आहे. या लग्नाला सासू माया यांनी विरोध केला होता. तरीही मुस्तफाने तिला पाच लाख रुपये उपसने दिले होते. या पैशावरून सावत्र सासू माया यांच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वरून सासू- जावई आणि मुलीत सतत भांडणेही व्हायची. मात्र त्या पैसा परत देत नसल्याने मुस्तफा संधीच्या शोधात होता.
क्राईम सीनवर गर्दी
भर दिवसा सिव्हील लाईनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सिताबर्डी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत, अंबाझरी ठाण्याचे निरीक्षक विनोद गोडबोले यांच्यासह गुन्हे शोध वार्ता विभागाची टीम आणि न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या दोन मोबाईल व्हॅनलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
डी मार्टमधून खरेदी केला चाकू
सासू पैसे परत करत नसल्याने जावई मुस्तफा खान हा सतत वाद घालत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो सासूला अद्दल घडविण्याचा कट रचत होता. घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी त्याने वानाडोंगरीतल्या डी मार्टमधून चाकू देखील खरेदी केला. अत्यंत नियोजित रित्या मुस्तफा खूनाच्या तयारीत होता. खून केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तो चेहऱ्यावर मास्क घालून सासूच्या मागावर होता. बुधवारी त्या एकट्याच घरी जात असल्याचे दिसताच मुस्तफाने सासूला भर रस्त्यात गाठले आणि पाठीमागून वार करीत तिचा गळा चिरला. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हा खून होताना पाहिले. त्यामुळे परिसरात दिवसभर या खूनाचा चर्चा होती.