नागपूर : माहेरच्या लोकांविषयी आणि घरातील काम करण्यावरून वारंवार सुनेला टोमणे मारणाऱ्या सासूचा सुनेने कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. ही थरारक घटना भिवापूर तालुक्यातील झिलबोडी गावात घडली. हिराबाई सिद्धार्थ पाटील (४५, झिलबोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सून रक्षंदा पाटील (२२) हिला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झिलबोडी गाव असून तेथे सिद्धार्थ पाटील यांचे कुटुंब राहते. ते आणि पत्नी हिराबाई शेती कसतात तर मुलगा रवी हा खासगी वाहनावर चालक आहे. रवीचे दोन वर्षांपूर्वी नागभीड येथील रक्षंदा हिच्याशी लग्न झाले. रक्षंदाची आई रेल्वेत नोकरी करते. त्यामुळे रक्षंदा उच्चशिक्षित असून नातेवाईक असलेल्या शेतकरी रवीशी लग्न करून देण्यात आले. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासू हिराबाई ही सुनेला टोमणे मारत होती. तसेच वाद घालून अपमान करीत होती. वारंवार माहेरच्या लोकांना शिवीगाळ करून दोष देत होती.

हेही वाचा – गजानन महाराजांचा संदेश पाठवा मनोकामना पूर्ण करा.. प्रकरण काय?

सासूच्या नेहमी टोमणे मारण्याच्या सवयीला कंटाळून रक्षंदा लग्नाच्या तिसऱ्याच महिन्यात माहेरी निघून गेली. तिच्या पाठोपाठ पती रवीही सासरी राहायला आला. तो एका कॅटरर्सकडे वाहन चालविण्याचे काम करीत होती. दोघांचा संसार व्यवस्थित सुरू असताना त्यांना एक गोंडस बाळ झाले. दोघांहीनी बाळासह घरी परतण्याचा निर्णय घेतला. रक्षंदा ही पती आणि बाळासह सासरी राहायला आली. नातू बघून हिराबाई यांचा स्वभाव बदलेल असा विश्वास रक्षंदाला होता. मात्र, सासरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून सासू टोमणे मारायला लागली. चार महिने सुनेने दुर्लक्ष केले. परंतु, सासूचा मानसिक आणि शारीरिक त्रास वाढल्यामुळे सुनेने तिचा काटा काढण्याचा कट रचला. तिने ४ जून रोजी सासरा शेतात गेल्यानंतर घरात झोपलेल्या हिराबाईवर कुऱ्हाडीने वार केले. सासूचा खून केल्यानंतर शेजारी बसायला निघून गेली.

हेही वाचा – मरीन ड्राईव्ह वसतिगृह हत्या प्रकरणात नवीन माहिती, तरुणी दोन दिवसांनंतर घरी…

सुनेने केला हत्याकांडाचा बनाव

शेजारी बसायला गेलेल्या रक्षंदाने घरी येऊन सासूचा कुणीतरी लुटमार करण्याच्या उद्देशाने खून केल्याची ओरड करीत बनाव केला. मात्र, पोलिसांनी तिची उलट चौकशी केल्यानंतर तिचे बिंग फुटले. तिने खून केल्याची कबुली दिली. ‘माझ्या सहा महिन्यांच्या बाळाचा सांभाळ कोण करेल?’ अशी भावना व्यक्त करून हंबरडा फोडला. पोलिसांनी तिला लगेच अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law murdered in zilbodi village adk 83 ssb
First published on: 07-06-2023 at 16:19 IST