अमरावती : जागेच्या वादातून आई-वडील व मुलावर लोखंडी सळाखीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई व मुलाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे घडली. घटनेनंतर मारेकरी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.कुंदा विजय देशमुख (६६) व सूरज विजय देशमुख (३२) अशी मृत मायलेकांची नाव आहे. विजय देशमुख (७०) असे जखमी वडिलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी देवानंद लोणारे याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

विजय देशमुख यांच्‍या शेजारी आरोपी देवानंद आपल्या कुटुंबासह राहतो. त्या दोघांच्या घरांच्‍या मध्ये खुली जागा आहे. या जागेवरून देशमुख व लोणारे यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. या वादात लोणारे याने घरातून सळाख आणून अचानक सूरज यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे विजय व कुंदा हे दोघे मुलगा सूरज याला वाचवायला गेले. त्यावर देवानंदने त्यांच्यावरही हल्ला चढविला. यामध्ये कुंदा, सूरज व विजय हे तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्याचवेळी देवानंद तेथून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी विजय, कुंदा व सूरज यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुंदा व सूरजला यांना मृत घोषित केले, तर विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>>तब्बल दोन हजार प्रवासी फुकटे; १४ लाखांहून अधिक….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथक व फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी देवानंदचा कसून शोध सुरू आहे.