बुलढाणा : जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासह लाखो विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उच्च दर्जाच्या व सीबीएससी पॅटर्नच्या शिक्षणपद्धतीसाठी प्रसिद्ध, अशी एक शैक्षणिक संस्था लवकरच कार्यान्वित होण्याची सुचिन्हे आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ते यासाठी ‘दिल्ली ते गल्ली’ पाठपुरावा करीत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे त्यांनी बुलढाणा शहरात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. या विद्यालयासाठी लागणाऱ्या जागेसाठीचे निकष कडक आहेत. त्या कसोटीवर बसणाऱ्या जागेचा (भूखंडाचा) युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. या नियोजित संस्थेत ‘सीबीएससी पॅटर्न’वर आधारित वर्ग १ ते १० चे वर्ग राहणार आहेत. केवळ गुणवत्तेवर या शाळेत प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे प्रतिभावंत परंतु गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – जिल्हा न्यायालयातही ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ची व्यवस्था, राज्य शासनाने दिले एक कोटी
हेही वाचा – यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आजारी; एमआरआय, सोनोग्राफी, सीटीस्कॅनसाठी…
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
आवश्यक जागा मिळेपर्यंत, तूर्तास स्टेट बँक चौकातील जुन्या शासकीय डीएड महाविद्यालयाच्या इमारतीचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र तेथील इमारत व खोल्यांची दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांची डागडुजी व नूतनीकरण करून तूर्तास त्या जागी वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालय बुलढाण्यात सुरू होण्यातील अडचण दूर झाली आहे.