देवेश गोंडाणे

राज्य लोकसेवा आयोगाने २० सप्टेंबरला होणाऱ्या पूर्व परीक्षेची शंभर टक्के तयारी केली होती. परीक्षार्थीना केंद्र बदल करून देत करोनामुळे परीक्षेत घ्यावयाच्या विशेष काळजीच्या मागदर्शक सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या धोरणाला आपला विरोध असताना राज्यात परीक्षा कशी घ्यायची म्हणून राज्य सरकाने आयोगाला विश्वासात न घेता  एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, राज्य सरकारने परस्पर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी आयोगाकडून अद्यापही यासंदर्भात अधिकृत पत्र काढण्यात आलेले नाही. सरकारच्या या राजकीय खेळीमुळे राज्यातील लाखो परीक्षार्थी बळी पडल्याचा आरोप केला जात आहे.

जेईई आणि नीट परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारकडून प्रखर विरोध होत आहे. काँग्रेसने याविरोधात देशभर आंदोलन सुरू केले आहे. राज्यात तीन लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असून एमपीएससी परीक्षेकडे आशेने बघत होते. मात्र, आयोगाला कुठेही विश्वासात न घेता सरकारच्या या निर्णमुळे विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. यावर्षी राजकीय स्वार्थापोटी तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त केली.

आयोग म्हणते..

परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून जाहीर केला असला तरी राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात अद्यापही परीक्षेच्या तारेखत बदल केलेला नाही. तसेच अधिकृत पत्रही काढले नाही. आयोगाच्या संकेतस्थळावरही २० सप्टेंबरलाच परीक्षा होणार असल्याचे दिसत आहे. आयोगाला कुठलीही माहिती न देता मुख्यमंत्र्यांनी परस्पर परीक्षा समोर ढकलण्याचे जाहीर केल्यामुळे आता आयोगानेच राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आयोग परीक्षा घेण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे चित्र आहे.

आम्ही राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात नुकतेच पत्र लिहिले आहे. त्याचे उत्तर आल्यावरच परीक्षेबाबत निर्णय होईल. तूर्तास राज्य सरकारच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत.

– प्रदीपकुमार सचिव, राज्य लोकसेवा आयोग