राज्यातील पहिले शासकीय केंद्र ठरणार

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात राज्यातील पहिले म्युकरमायकोसिस, मॅक्सिलोफेशियल रिहॅबलिटेशन केंद्र प्रस्तावित आहे. तसा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर होईल. या केंद्रात करोनापश्चात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर गुंतागुंतीच्या जबडा, नेत्र, दातासह इतरही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतील. प्राथमिक स्वरूपात या शस्त्रक्रिया येथे सुरू झाल्या आहेत. परंतु भविष्यात त्या केंद्रात होतील. हा प्रकल्प मंजूर झाल्यास तो राज्यातील शासकीय रुग्णालयातील पहिलाच प्रयोग ठरेल.

शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता व मुखशल्यक्रिया शास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. अभय दातारकर म्हणाले, करोनापश्चात राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात नागपूरचाही समावेश होता. विभागात आजपर्यंत दोन हजारावर रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाणही सुरुवातीला जास्त होते. परंतु कालांतराने  यशस्वी उपचाराने रुग्ण बरे झाले. अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी बुरशी लागलेले डोळे, जबडा, दात, टाळू काढावा लागला. या रुग्णांमध्ये विविध अवयवायांच्या प्रत्यारोपणाची गरज आहे.  शासकीय दंत महाविद्यालयातील या केंद्रामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य परत आणण्यास मदत होईल.

केंद्र मिळण्यापूर्वी या पद्धतीच्या शस्त्रक्रिया मुखशल्यक्रिया विभागासह इतर विभागाच्या समन्वयाने केल्या जाणार आहेत. याबाबत माहिती देताना डॉ. अरुण खेळीकर म्हणाले, नाकातील सायनेसेसजवळ म्युकरची सुरुवात होते. नाकापासून दात, मेंदूपर्यंत जाणारा हा आजार आहे. त्वचा व डोळ्यांनाही याचा फटका बसतो. त्यामुळेच उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करताना कोणाचे डोळे, तर कोणाचा जबडा काढण्यात येतो. चेहरा विद्रूप होतो. यामुळे  रुग्णामध्ये न्यूनगंड  निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे अशा रुग्णांवर जबडा प्रत्यारोपण किंवा कृत्रिम डोळा लावणे आवश्यक आहे.  जबडा काढलेल्या एका रुग्णावरील इम्प्लांटचा खर्च हा शासकीय रुग्णालयांत १ ते सव्वा लाखावर जातो. यामुळे तो गरिबांच्या आवाक्यात नाही. ही बाब लक्षात घेत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांच्याकडे यासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विदर्भ सहायता निधीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला. त्यामुळेच मध्यभारतात पहिले पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस मॅक्सिलोफेशियल रिहॅबलिटेशन सेंटर दंत महाविद्यालयात सुरू होण्याची शक्यता आहे.

म्युकरच्या ७० रुग्णांवर शस्त्रक्रिया

दंत महाविद्यालय व रुग्णालयात आजपर्यंत म्युकरच्या ११८ रुग्णांची नोंदणी झाली. त्यातील ६० रुग्णांवर दंत रुग्णालयात तर इतर १० रुग्णांवर दंतच्या पथकाने एम्समध्ये जाऊन शस्त्रक्रिया केली. या सगळ्या ७० रुग्णांवर जबडा प्रत्यारोपण आवश्यक असून ते दंत रुग्णालयात करणे प्रस्तावित आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मिळणार आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी ४ ते ५ लाखांचा खर्च लागतो. येथे ही शस्त्रक्रिया नि:शुल्क होईल. केंद्राच्या विस्तारीकरणासाठी दोन हजार चौरस फूट जागेवरील प्रस्ताव लवकरच शासनाला दिला जाणार आहे.