नागपूर – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मनोज जारांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना केली होती. त्यावर विविध माध्यमांसह मराठा समाजात चर्चा सुरू असतानाच मुधोजी राजे भोसले यांनी या वक्तव्यावर आता सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
मुधोजी राजे भोसले म्हणाले, मी मराठा आंदोलनाचा कुठेच विरोध केला नाही व ओबीसी आंदोलनाला पाठिंबाही दिलेला नाही. मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन सुरू आहे. यात महाराष्ट्रातील लाखो मराठा सहभागी झाले आणि होत आहेत. या आंदोलनाच्या संदर्भात माध्यमांनी माझी भूमिका जानून घेतली. त्यावर मी भूमिका जाहीर केली की, कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको. “मराठा समाजाला शिक्षणासाठी व नोकरीसाठी मराठा म्हणून हक्काचं आरक्षण मिळावे. जेणेकरून ते टिकेल.”
मी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन शुभेच्छाही दिल्या आहे. परंतु काही माध्यमानी बातमी चालवली की मी जरांगेंना फटकारले. मराठा आंदोलनाला विरोध केला. ओबीसी आंदोलनाला मी पाठिंबा दिला. हे अत्यंत चुकीच आहे. मी मराठा आंदोलनाचा कुठेचं विरोध केला नाही. आणि ओबीसी आंदोलनाला पाठिंबाही दिलेला नाही. या माध्यमातून माझी माध्यमांना विनंती आहे की, चुकीची बातमी चालवू नका. चुकीच्या बातमीमुळे मराठा समाजाच्या भावना दुखवल्या जात आहे. समाजात गैरसमज निर्माण होत आहे. मराठा समाजाच्या भावनांचा कृपया आदर करा. चुकीच्या बातम्यांमुळे समाजाच्या भावना दुखवल्या आसतील तर मी दिलगिरीही व्यक्त करतो, असेही मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले.
मुधोजी राजे भोसले यापूर्वी काय म्हणाले होते ?
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.
आम्ही मराठा आहोत, त्याचा अभिमान आहे. आम्ही देणारे आहोत, अशा स्थितीत कोणाचा अधिकार हिसकावून आरक्षण घेण्याचा प्रश्न येत नाही, असे भोसले म्हणाले होते.