नागपूर : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपावरील दीड ते दोन रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल. त्यामुळे राज्यातील व्यावसायिक, औद्योगिक व जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज दर युनिटमागे सुमारे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

नागपुरातील महावितरण कार्यालयात बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकेश चंद्र म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या ९ हजार २०० मेगावॉट प्रकल्पावर काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. येत्या महिन्याभरात राज्यात ५० मेगावॉट, डिसेंबरपर्यंत ५०० मेगावॉट, मार्च २०२५ पर्यंत ३ हजार मेगावॉट तर सप्टेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण ९ हजार २०० मेगावॉटचा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…ऊर्जामंत्री फडणवीसांच्या नागपुरात वीज यंत्रणा टाकणार कात!; ३१३ कोटींच्या निधीतून…

क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार

महावितरणकडून सरकारी- भागीदारी तत्त्वावर ३ हजार ५०० मेगावॉटचे कार्यादेश दिले गेले. मार्च २०२६ पर्यंत १५ ते १६ हजार मेगावॉटचे काम दिले जाईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असेही लोकेश चंद्र म्हणाले. सध्या कृषी पंपासाठी शासनाकडून काही क्रॉस सबसिडी दिली जाते. इतर भार व्यावसायिक, औद्योगिक आणि जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांवर टाकला जातो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होऊन व्यावसायिक, औद्योगिक, जास्त वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज दर युनिटमागे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील. उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॉटपर्यंत जाते. ही मागणी २०३० पर्यंत ४५ हजार मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने सौर, पवन ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्पातून सुमारे ३५ हजार मेगावॉट वीज मिळवण्याचे नियोजन केल्याचेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात विविध कामगार संघटनांनी विविध टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. या विषयावर लोकेश चंद्र म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाला आहे. कर्मचाऱ्यांसोबतही चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा…महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, नागपुरातील सहाही जागांवर काँग्रेसचा दावा; विकास ठाकरे म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात ४५ लाख कृषी ग्राहक

महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्‍यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली गेली.