यवतमाळ : नगरपालिकेच्या नामांकनासाठी अवघा आठवडा उरला असताना, एकाही पक्षाकडून अद्याप नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित झालेले नाही. महायुतीबाबत अद्याप काहीही ठरले नसताना यवतमाळमध्ये भाजप प्रतिसाद देत नसल्याने शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणूक सोबत लढविण्यासाठी ‘फॉर्म्युला’ ठरवला आहे.
सत्ताधारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत लढणार असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखंत्र्यांनी वारंवार स्पष्ट करूनही, प्रत्यक्षात स्थिती उलट आहे. भाजप पक्षाचे स्थानिक नेते शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना महायुतीसंदर्भात काहीही ठोस सांगत नसल्याचे चित्र आहे.
भाजपने अद्याप होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही. महायुती संदर्भात केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याने शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने युती निश्चित करून लढण्याचे ठरविले आहे. शिवसेना ३२ तर राष्ट्रवादी काँग्रेस २६ जागांवर निवडणूक लढणार आहे. नामांकन दाखल करेपर्यंत भाजप महायुतीत सहभागी होईल, अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.
यवतमाळ नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा थेट लढतीचे चित्र सुरुवातीला होते. मात्र, जागा वाटपावरून महायुतीत ओढताण सुरू आहे. यामुळे यवतमाळ नगरपालिकेसाठी शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी भाजपला बाजूला ठेवून युती करत दोन्ही पक्षातील जागावाटपाच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. शिवसेना नगराध्यक्षपदासह ३३ जागेवर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ३६ जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जागावाटप पूर्ण झाले असून उमेदवारही जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप कोणत्याही उमेदवाराला स्पष्ट सूचना दिलेल्या नाही. महायुती होणार नाही, स्वतंत्र लढणार असे समजून तयारी करण्याचे निर्देश संभाव्य उमेदवारांना देण्यात आले आहेत.
२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत यवतमाळ नगर पालिकेत नगराध्यक्ष शिवसेनेचा तर सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे असे चित्र होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी यावेळी नगर पालेकर आपलीच सत्ता यावी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. यवतमाळ शहरात भाजपची पकड असून, शिवसेना, राष्ट्रवादी काठावर आहे. त्यामुळे महायुती करून भाजपाने शहरात पक्षाचे नुकसान करू नये, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रस्तावाला अद्याप भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात येते.
नागपूरमध्ये खलबते
महायुती तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत भाजपाने नागपूर येथे पदाधिकार्यांना बोलावले आहे. काही पदाधिकारी महायुतीच्या बाजूने आहे. यामुळे महायुतीचा निर्णय नागपूरातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच बैठकीत आदिवासी विकास मंत्री प्रा अशोक उईके यांची कन्या ॲड. प्रियदर्शनी उईके यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून घोषित करायचे काय, यावरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आज, उद्यापर्यंत नगरपालिका निवडणुकीच्या युतीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.
