यवतमाळ : रंगपंचमीस मित्रांसोबत रंग खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह शहरातील पिंपळगाव परिसरात एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. रोशन देविदास बिनझाडे (२२, रा. रविदास नगर, मच्छी पुलाजवळ, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. शहरातील रविदास नगर परिसरातील मच्छी पुलाजवळ देविदास बिनझाडे कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. धूलिवंदनाच्या दिवशी ८ मार्चला त्यांचा मुलगा रोशन मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी घराबाहेर गेला होता.

मात्र, बराच वेळ होऊन तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. १० मार्चला कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. शनिवारी पिंपळगाव परिसरातील एका विहिरीत नागरिकांना मृतदेह तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, शहर ठाणेदार नंदकुमार पंत, सहायक पोलीस निरीक्षक सचीन लुले पाटील, जनार्दन खंडेराव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा >>> ऐकलं का?..आता पोलीस देणार भिकाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण!, नागपुरात नवीन प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या रोशनचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची चर्चा आहे. याप्रकरणी त्याचे वडील देविदास बिनझाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. रोशनची हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. अन्य एका संशयितास पोलिसांनी ८ मार्च रोजीच एका अन्य प्रकरणात ताब्यात घेऊन त्याची कारागृहात रवानगी केली होती. आता या दोन संशयितांच्या चौकशीनंतर रोशनच्या हत्येचे गूढ उकलणार आहे.