नागपूर : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनीला धर्माच्या आधारावर शाळेत प्रवेश नाकारल्या प्रकरणी जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालयाचे सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात जरिपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापीक डॉ. गिता हरवानी यांनी पोलीस आणि अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांकडून या प्रकाराबद्दल तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारावर आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या चौकशीत सदर प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यात आली.
ही तक्रार खरी असल्याचे चौकशीत पुढे आले. अखेर शाळेच्या मुख्याध्यापिका गीता हरवानी यांच्या तक्रारीवरुन शाळेचे सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ नुसार (जाणिवपूर्वक दृष्ट हेतून धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण
शाळेचे सचिव राजेश लालवानी यांनी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात शाळेत मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्याचे निर्देश शिक्षकांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही शिक्षकांनी लालवानी यांच्या दबावाखाली मुस्लिम मुलींचे प्रवेश अर्ज प्रलंबित ठेवले, तर काही पालकांना जागा रिक्त नसल्याचे कारण सांगत प्रवेश देण्यास तोंडी नकार दिला. मुख्याध्यापीका हरवानी यांच्या तक्रारीवरून, संबंधित विद्यार्थिनीची आई इयत्ता सहाव्या वर्गातील प्रवेशासाठी गेली असता तिला रिक्त जागा नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, शाळेत जागा रिक्त असल्याची माहिती संबंधित पालकांना मिळाली. त्याआधारे त्यांनी शाळेत पुन्हा संपर्क केला असता, मुस्लीम विद्यार्थिनीला प्रवेश देण्यास संस्था सचिवांनी नकार दिल्याचे, प्राथमिक तपास अहवालात नमूद आहे. तसेच याचे भ्रमनध्वनी ध्वनीमुद्रण आहे.
या भेदभावाविरोधात विद्यार्थिनींच्या पालकांच्या वतीने हरवानी यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेत आयोगाने महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत सदर प्रकार धर्माच्या आधारावर झालेला भेदभाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, शाळेचे सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्याविरुद्ध विविध संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव होऊ नये. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांमध्ये जर अशाप्रकारचा गैर कारभार सुरू असेल तर राज्य अल्पसंख्याक आयोग ते खपवून घेणार नाही. शिक्षण हे सर्वांसाठी आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कुठल्याही भेदभावाला थारा नसावा. – प्यारे खान, अध्यक्ष, राज्य अल्पसंख्याक आयोग.
संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार तपास सुरू असून तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल. – अरुण क्षिरसागर, ठाणेदार, जरीपटका.