प्रशांत देशमुख
वर्धा : कार्यकर्त्यांचे प्रेम नेत्यांसाठी मोठी ऊर्जा ठरते. म्हणून धडाक्यात स्वागत, नारेबाजी, पुष्पवृष्टी झाली की नेत्यास भरून येते. पुढारीपण भरून पावल्याची भावना येते. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बहुदा झाले. वार्धेत येताच प्रथम त्यांनी राष्ट्रपित्याच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत अभिवादन केले. मग याच परिसरात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले.
ढोल ताश्याच्या गजरात पुष्पवृष्टी झाली. स्वागताचे नारे लागले. कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा गुलाल उधळत होते. ही मुनगंटीवार यांच्या साठी मोठी पावती होती. स्वागतात कोणतीच कमी नसल्याचे पाहून ते गहिवरले, म्हणाले या स्वागताने माझा चार वर्षाचा थकवाच निघून गेला. याची भरपाई विकास कामांच्या माध्यमातून केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित खासदार आमदारांना दिली. आमदार डॉ.पंकज भोयर यांनी यास दुजोरा दिेला.