अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी असून काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा दिसून येते. दोन्ही प्रमुख पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेत उमेदवारांची शनिवारी चाचपणी करण्यात आली.

नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने उमेदवार निवडीचे मोठे आव्हान राजकीय पक्ष नेतृत्वापुढे आहे. भाजपने आज तेल्हारा, हिवरखेड आणि अकोट येथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे , संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, डॉ.अमित कावरे, विजय अग्रवाल आदींच्या मार्गदर्शनात मुलाखती घेण्यात आल्या.

नामाप्र महिलेसाठी अकोट, हिवरखेडचे अध्यक्षपद, अनुसूचित जाती महिलेसाठी तेल्हाराचे अध्यक्षपद राखीव आहे. भाजपने पक्ष निरीक्षक नेमले होते. त्यांनी अहवाल पाठवल्यानंतर आता इच्छुकांची मते जाणून घेतली. अकोट येथे ३१, हिवरखेड १९ व तेल्हारा येथे २१ जण इच्छूक असून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदस्य पदाच्या नामाप्र जागेसाठी ४३२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. अनुसूचित जाती व जमातीच्या जागेसाठी ६० व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४४२ इच्छुकांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली. अल्पसंख्याक समाजातील २५ जण सुद्धा भाजपच्या तिकीटासाठी इच्छूक आहेत. प्रभारी म्हणून आमदार रणधीर सावरकर यांच्यावर जबाबदारी आहे. उमेदवारीसाठी इतर पक्षातील काही इच्छूक देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून लढण्यासाठी देखील अनेक जण इच्छूक असून पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल, ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे, प्रभारी दिलीप सरनाईक, जिल्हाध्यक्ष अशोक आमानकर, ॲड. महेश गणगणे, डॉ. झिशान हुसेन आदींच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांचे मते जाणून घेण्यात आली. अकोट, हिवरखेड, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथून लढण्यासाठी अनेक जण इच्छूक असून उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.

युती, आघाडीचा निर्णय गुलदस्त्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर पालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी अद्याप महायुती व महाविकास आघाडीचा निर्णय जाहीर झाला नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची यादी केली जात असल्याचे चित्र दिसून येते. नेमके समीकरण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.